गोंदिया: आमगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतून ३ नोव्हेंबर रोजी पाच तासात पाच चोऱ्या करून फरार झालेल्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ३ नोव्हेंबरच्या सायंकाळी गोंदिया रेल्वे स्थानकावरून अटक करून आमगाव पोलिसांच्या स्वाधीन केले. अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून लाखो रूपयाचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. प्रविण अशोक डेकाटे (२८) रा. तिलकवाडी मोहाडी, जि. भंडारा असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
आमगाव तालुक्याच्या गोरठा येथील अरूणा भय्यालाल तरोणे (४०) रा. गोरठा यांच्या घरून ३ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता तीन हजार रुपये रोख, पाच ग्रॅम वजनाचे सोन्यातील दोन कानातल्या बिऱ्या किंमत २५ हजार रुपये, ७ ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या गळ्यातील हार किंमत ३५ हजार रुपये, चांदीची पायल एक जोडी पायल १५० ग्रॅम वजनाची किंमत १५ हजार रुपये असा एकूण ७८ हजार रुपयांचा माल चोरून नेला. त्यानंतर कुंभारटोली येथील योगिता कैलास रहिले (३१) रा. कुंभारटोली यांच्या घरून स्टीलच्या दिवानच्या स्टीलच्या डब्यात ठेवलेला सोन्याच्या डोरला किंमत ५ हजार रुपये चोरून नेला. नंतर सकाळी ११ वाजता कुंभारटोली येथील सरिता रवी पाथोडे (३६) यांच्या घरी कुणीच नसल्याने दाराचा कुलूप तोडून घरातील साहित्य अस्ताव्यस्त फेकून चोरी करण्याचा प्रयत्न केला. परंतु या ठिकाणी काहीही सापडले नाही.
रिसामाच्या वॉर्ड क्रमांक ४ येथून येथील घनश्याम सुखराम बावनथडे (४८) रा. सिद्धार्थनगर गोंदिया रोड आमगाव यांची आई गावी गेली असताना त्यांच्या घराच्या समोरच्या दाराची कुलूप तोडून चोरट्याने लाकडी अलमारीच्या सुटकेस मधून ४ हजार रुपये चोरून नेले. पाचवी चोरी बिरसी येथील खेमलाल चुनीलाल पटले (५८) यांच्या घरी करण्यात आली. घराचे दार तोडून दुपारी २ वाजताच्या सुमारास १ लाख ८४ हजाराची चोरी केली. त्यात १० ग्रॅम वजनाचे दोन सोन्याची झुमके किंमत ५० हजार, ५ ग्राम वजनाचे सोन्याचे बारीक मणी ४१ नग किंमत २५ हजार, आठ ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या अंगठ्या किमती ४० हजार, पाच ग्रॅम वजनाचे झुमके किंमत २५ हजार, पाच ग्रॅम वजनाचे ६ नग सोन्याचे गहू मणी किंमत २५ हजार, १५० ग्रॅम किमतीच्या चांदीचे पायल किंमत १५ हजार व ४ हजार रुपये किंमतीचा मोबाईल असा एक लाख ८४ हजाराचा माल पळविला. या पाच चोऱ्यांत २ लाख ७१ हजाराचा माल चोरी करणाऱ्या त्या आरोपीला माल घेऊन जात असतांना गोंदियाच्या रेल्वेस्थानकावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक करून आरोपीला आमगाव पोलिसांच्या स्वाधीन केले.