गोंदिया : जिल्ह्यात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अनेक कुटुंबांतील सदस्य बाधित झाल्यामुळे बहुतांश कुटुंबातील उत्पन्न नाहीसे झाले आहे. अशा वेळेस प्रशासनाकडून मदत करण्यासाठी ‘प्राधान्य कुटुंब योजना’ राबवून जिल्ह्यातील पाच हजार कुटुंबांना धान्याचा लाभ देण्याकरिता कालबद्ध कार्यक्रमाच्या माध्यमातून शिधापत्रिकांचे वाटप करण्यात येणार आहे.
जिल्ह्यात प्राधान्य कुटुंब योजनेचे एक लक्ष ४३ हजार ७६१ कुटुंबातील सहा लक्ष ७३ हजार ३३२ लाभार्थी व अंत्योदय योजनेत ७८ हजार ४५७ कुटुंबातील तीन लक्ष ४९ हजार २६ लाभार्थी धान्याचा लाभ घेत आहेत; परंतु कोरोनाकाळात अनेक कुटुंबांचे आर्थिक उत्पन्न कमी झाल्यामुळे या कुटुंबांची परिस्थिती हलाखीची झाली आहे. त्यामुळे अशा कुटुंबांना योजनेचा लाभ देण्याकरिता जिल्ह्यातील पाच हजार कुटुंबांचा समावेश करण्यात येणार आहे. या योजनेत तब्बल २० हजार नागरिकांना धान्य प्राप्त होणार आहे. याकरिता जिल्हा प्रशासनामार्फत कालबद्ध कार्यक्रम राबवून सर्व तालुक्यात गरजू लाभार्थ्यांना शिधापत्रिकेचे वितरण करण्यात येईल. जिल्ह्यात रेशनकार्डद्वारे अन्नधान्याचा लाभ घेणारे एकूण दोन लक्ष २२ हजार २१८ कुटुंबांतील १० लक्ष २२ हजार ३५८ लाभार्थी आहेत. त्यामुळे कोरोनाकाळात आर्थिक उत्पन्नाचा फटका बसलेल्या समाजातील गरजू घटकांना प्राधान्य कुटुंब योजनेच्या माध्यमातून धान्याचा लाभ घेण्याकरिता शिधापत्रिका तयार करण्यासाठी संबंधित तहसील कार्यालयातील पुरवठा विभागात संपर्क साधावा आणि योग्य तो अर्ज भरून योजनेचा लाभ घ्यावा, असे जिल्हाधिकारी खवले यांनी कळविले आहे.
------------------------
शिधापत्रिकांसाठी तालुकानिहाय शिबिरांचे आयोजन
जिल्ह्यात प्राधान्य कुटुंब योजना राबविण्याकरिता तालुकानिहाय विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येणार असून, त्याकरिता कालबद्ध कार्यक्रम नियोजित करण्यात आला आहे. यात, १२ ते १७ जुलैदरम्यान शिधापत्रिका तयार करण्यासाठी अर्ज स्वीकारणे, नाव दुरुस्ती करणे, नाव कमी करणे इत्यादी कार्यवाही करण्यात येईल. यानंतर १९ ते ३१ जुलैदरम्यान अर्जांची छाननी करण्यात येईल, तसेच २ ते ६ ऑगस्टदरम्यान अर्जदारांना शिधापत्रिका वितरित करण्यासंबंधी कार्यवाही व ७ ते १३ ऑगस्टदरम्यान केलेल्या कारवाईसंदर्भात अहवाल सादर करण्याकरिता सर्व तहसीलदारांना सूचना करण्यात आल्या आहेत.