गोंदिया : घरी एकटीच महिला पाहून तिचा विनयभंग करणाऱ्या हेमराज ऊर्फ हेमू ब्रिजलाल वाधवानी (५८) रा. हरीकाशीनगर, माताटोली गोंदिया या आरोपीला ४ वर्षांचा साधा कारावास, एक वर्षांचा सश्रम कारावास व १२ हजार रुपये दंड ठोठावला. ही सुनावणी मुख्य न्याय दंडाधिकारी अभिजित कुलकर्णी यांनी १० जुलै रोजी केली.
गोंदिया शहराच्या हरीकाशीनगर, माताटोली येथील आरोपी हेमराज ऊर्फ हेमू ब्रिजलाल वाधवानी (५८) याने १७ ऑक्टोबर २०२१ रोजी सकाळी ११:४५ वाजता पीडित महिला एकटी असल्याचा फायदा घेऊन तिचा विनयभंग केला. यासंदर्भात गोंदिया शहर पोलिसांत भादंविच्या कलम ३५४, ३५४ (अ) अन्वये गुन्हा नोंद केला होता. आरोपीविरुद्ध सबळ साक्ष पुराव्यावरून दोषसिद्ध झाल्याने १० जुलै २०२४ रोजी मुख्य न्यायदंडाधिकारी अभिजित कुलकर्णी यांनी आरोपीला शिक्षा सुनावली.
या गुन्ह्याचा तपास महिला पोलिस उपनिरीक्षक प्राजक्ता पवार यांनी केला होता. न्यायालयात सरकार पक्षातर्फे युक्तिवाद सहायक सरकारी अभियोक्ता कमलेश दिवेवार यांनी केला आहे. न्यायालयीन कामकाजासाठी पोलिस हवालदार ओमराज जामकाटे, पोलिस शिपाई रामलाल किरसान यांनी सहकार्य केले.