गोंदिया : बहुप्रतीक्षित आणि मागील पंधरा वर्षांपासून उड्डाणाच्या प्रतीक्षेत असलेल्या गोंदिया येथील बिरसी विमानतळावरून खासगी प्रवासी वाहतुकीसाठी उड्डाणाचा योग लवकरच जुळून येणार असून, डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशनने परवानगी दिली आहे. त्यामुळे आता या महिन्याच्या शेवटी किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात गोंदिया-इंदोर अशी प्रवासी वाहतूक विमानसेवा सुरू होणार आहे. खासदार सुनील मेंढे यांनी सातत्याने गोंदिया विमानतळावरून प्रवासी वाहतूक सुरू व्हावी, यासाठी विषय लावून धरला होता. त्याचे फळ आता होताना दिसत आहे. गोंदिया येथील बिरसी विमानतळ २००५ पासून तयार होऊनही या विमानतळावरून अजूनपर्यंत प्रवासी वाहतूक विमानसेवा सुरू झाली नव्हती. या ठिकाणी प्रशिक्षित झालेले वैमानिक देशात विविध ठिकाणी सेवा देत आहेत; मात्र प्रत्यक्षात गोंदियाचे विमानतळ आतापर्यंत दुर्लक्षित होते. प्रवासी विमान वाहतुकीस परवानगी मिळाल्याने तब्बल पंधरा वर्षांनंतर वाहतुकीचा योग जुळून आला आहे. नागरी हवाई वाहतूक मंत्री हरदीप सिंग पुरी, एअरपोर्ट ॲथॉरिटी ऑफ इंडियाचे अरविंद सिंग, एअर इंडियाचे अध्यक्ष राजीव बंसल यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांशी आणि लोकसभेतही या संदर्भात प्रश्न उपस्थित करून खासदारांनी हा विषय लावून धरला होता. प्रत्यक्ष मंत्रिमहोदय आणि संबंधित अधिकाऱ्यांशी भेटून त्यांना प्रवासी विमानसेवेसोबतच कार्गो वाहतुकीचे महत्त्व पटवून दिले होते. जवळपास आठ ते दहा वेळा त्यांनी संबंधित व्यवस्थेशी पत्रव्यवहार करून हा विषय प्रकर्षाने मार्गी लावावा, असा आग्रह धरला होता. याला यश येऊन अखेर गोंदिया विमानतळावरून प्रवासी वाहतुकीचा मार्ग जवळपास मोकळा झाला आहे. डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशनने बिरसी विमानतळाची तपासणी करून परवाना तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. सोबतच विमानतळावर आवश्यक त्या सुविधा आणि प्रक्रिया पूर्ण करण्याचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना दिल्याने प्रवासी वाहतुकीचा मार्ग आता सुकर झाला आहे.
......
बिग प्लाय कंपनी झाली तयार
केंद्र शासनाच्या उड्डान योजनेंतर्गत ही विमानसेवा नागरिकांच्या सेवेत सुरू होणार आहे. विशेष म्हणजे फ्लाय बिग या विमान कंपनीद्वारे इंदोर - गोंदिया - हैदराबाद अशी विमानसेवा सुरू करण्यासाठी तयारी सुरू केली आहे. या विमानसेवेचा लाभ भंडारा-गोंदियातील नागरिकांसह जवळील मध्यप्रदेश व छत्तीसगड राज्यातील नागरिकांनाही होणार आहे. प्रवासी विमान वाहतूक सेवेसोबतच लवकरच कार्गो सेवा ही या विमानतळावरून सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.