पालिकेची धरपकड मोहीम थंडबस्त्यात : वाहतुकीची कोंडी कायम लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : मोकाट जनावरांमुळे वाहतुकीला होत असलेली अडसर शिवाय अपघातांवर आळा बसावा यासाठी नगर परिषदेने शहरात मोकाट जनावरांची धरपकड मोहीम सप्टेंबर महिन्यात सुरू केली होती. या मोहिमेंतर्गत नगर परिषदेचे विशेष वाहन मोकाट जनावरांना पकडण्याचे काम करीत होते. मात्र पालिकेच्या या मोहिमेला ब्रेक लागला असून परिणामी जनावरे पुन्हा रस्त्यावर दिसून येत आहेत. यामुळे शहरातील स्थिती पुन्हा तशीच झाली आहे. शहरात बघावे तेथे रस्त्यांवर मोकाट जनावरांचा वावर दिसून येत आहे. या मोकाट जनावरांमुळे वाहतुकीला अडसर होत असून नागरिकांना वाहन चालविणे कठीण होऊ लागले आहे. शिवाय रात्रीच्या वेळी विशेषत: अपघात घडले आहेत. विशेष म्हणजे जनावरांमुळे घडलेल्या अपघातांत जीवीतहानीही झाली आहे. या सर्व बाबींना लक्षात घेत जिल्हाधिकारी डॉ. विजय सुर्यवंशी यांनी बैठक बोलावून नगर परिषदेला मोकाट जनावरांना पकडून वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्याचे निर्देश दिले होते. तसेच पोलीस विभागाकडूनही नगर परिषदेला मोकाट जनावरांची व्यवस्था करण्यासंदर्भात पत्र देण्यात आल्याची माहिती आहे. या सर्व बाबींना गांभीर्याने घेत नगर परिषदेने शहरातील मोकाट जनावरांना पकडण्याची मोहीम सप्टेंबर महिन्यात सुरू केली होती. नगर परिषदेकडे मनुष्यबळ कमी असल्यामुळे प्रायोगिक तत्वावर कंत्राटी पद्धतीवर ही मोहीम सुरू करण्यात आली होती व यासाठी एक विशेष वाहन कार्यरत होते. या वाहनात मोकाट जनावरे पकडून त्यांना नगर परिषदेच्या बाजूला जुन्या अग्निशमन कार्यालयात सोडले जात होते. नगर परिषदेने सप्टेंबर महिन्यात सुरू केलेल्या या मोहिमेमुळे शहरातील मोकाट जनावरांची समस्या व वाहतुकीला होत असलेला अडथळा काहीसा सुटणार होता. मात्र पशुपालकांकडून या मोहिमेला विरोध करीत नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांसोबत वाद विवादापर्यंत स्थिती आली होती. त्यामुळे काही दिवसांतच नगर परिषदेच्या या मोहिमेला ब्रेक लागला. असे झाल्याने पुन्हा जनावरांचे कळप रस्त्यावर दिसून येत असून वाहतुकीची समस्या वाढली आहे. जनावरांचा रस्त्यांवर वावर वाढल्याने पुन्हा मोहिम सुरू करण्याची गरज दिसून येत आहे. शहरात कोंडवाड्याची गरज नगर परिषदेने मोकाट जनावरांची मोहीम सुरू केली खरी. मात्र नगर परिषदेकडे ही जनावरे ठेवण्यासाठी कोंडवाडा नाही. त्यामुळे त्यांना नगर परिषदेच्या बाजूला जुन्या अग्निशमन कार्यालयात ठेवले जात आहे. मात्र तेथे जनावरांची देखभाल करण्यासाठी कुणीही नसतो. कित्येकदा ही जनावरे उपाशी राहतात. त्यामुळे नगर परिषदेने कांजीहाऊसची व्यवस्था केल्यास पकडण्यात आलेल्या जनावरांची देखभाल करता येईल.
मोकाट जनावरांचे कळप पुन्हा रस्त्यावर
By admin | Published: May 17, 2017 12:15 AM