गोंदिया : गोंदिया जिल्ह्यात सर्वत्र रविवारी रात्रीपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून सोमवारी सकाळी ही पावसाचा जोर कायम होता. मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झाली असून ४० मार्ग बंद झाले आहे. तर सर्वच प्रमुख धरणाचे दरवाजे उघडल्याने नदी नाल्यांना पूर आला असून अर्जुनी मोरगाव तालुक्यातील इटियाडोह आणि तिरोडा तालुक्यातील चोरखमारा सिंचन प्रकल्प ओव्हर फ्लो झाला आहे. हवामान विभागाने जिल्ह्यात बुधवारपर्यंत पावसाचा रेड अलर्ट दिला आहे. तर पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास पूर परिस्थिती अधिक बिकट होण्याची शक्यता आहे. पावसामुळे १५ ऑगस्टच्या ध्वजारोहण कार्यक्रमांवर सुध्दा प्रश्न चिन्ह निर्माण झाला आहे.
मुसळधार पावसामुळे महाराष्ट्र मध्यप्रदेशला जोडणाऱ्या गोंदिया-बालाघाट मार्गावरील बाघ नदीवरील छोट्या पुलावरुन १५ फूट वाहत आहे. त्यामुळे नदीकाठच्या ३५ गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. गोंदिया-कोहमारा मार्गावरील आजरी-डव्वा पुलावरुन पाणी वाहत असल्याने सडक अर्जुनी ते गोंदिया मार्ग बंद झाला आहे. गोरेगाव ते ठाणा मार्गावरील पांगोली नदीच्या पुलावरुन पाणी वाहत असल्याने हा मार्ग बंद झाला आहे. तर सालेकसा तालुक्यातील भजेपार-गांधीटोला, भजेपार-अंजोरा, भजेपार-बोरकन्हार, भजेपार-साकरीटोला, आमगाव सालेकसा, पानगाव सोनपुरी, पिपरिया -सालेकसा हा मार्ग बंद झाला आहे. मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील जवळपास ४१ वर प्रमुख मार्ग बंद झाले आहे. सालेकसा तालुक्यातील बेवारटोला प्रकल्प ओव्हर फ्लो झाल्याने या तालुक्यातील पूर परिस्थिती गंभीर झाली आहे.
जिल्ह्यातील सर्वच प्रमुख धरणाचे दरवाजे उघडले
जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पाऊस सुरु असल्याने धरणाची पाणी पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी सिरपूर धरणाचे ७ दरवाजे, कालीसरार ५ दरवाजे, पुजारीटोला धरणाचे १३ दरवाजे, संजय सराेवरचे ६ दरवाजे व बावनथडी प्रकल्पाचे ६ गेट उघडण्यात आले आहे. तर हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट दिल्याने प्रशासनाने जिल्ह्यातील नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
अनेक कर्मचारी अडकले
स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्वच शासकीय व निमशासकीय कार्यालय, शाळा महाविद्यालयामध्ये ध्वजारोहणाचा कार्यक्रम सोमवारी सकाळी होता. मात्र जिल्ह्यातील ४१ वर प्रमुख मार्ग बंद असल्याने अनेक कर्मचाऱ्यांना ध्वजारोहण कार्यक्रमापासून वंचित राहण्याची वेळ आली.