सालेकसा : तालुक्यातील ग्राम मुंडीपार १३ जून रोजी सर्पदंशाने मृत्यू झालेल्या दीपक मोहारे व सतवंती मोहारे यांच्या मृत्यूमुळे परिवार उघड्यावर पडला आहे. सतवंती याच कमावत्या असल्याने कुटुंब अडचणीत आले असतानाच, त्यांच्या मदतीसाठी समाजातून मदतीचा ओघ सुरू झाला आहे.
दिलीप मोहारे हे अर्धांगवायूने ग्रस्त असून, बिछाण्यावरच असतात. अशात सतवंती मोहारे मोलमजुरी करून कुटुंबाचा गाडा हाकत होत्या. मात्र, १३ जून रोजी रात्री त्यांना व मुलगा दीपक याला सर्पदंश झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे आता घरात दिलीप मोहारे यांच्यासह गायत्री (१८) व दिव्या (१०) या दोन मुलीच उरल्या आहेत. आता कमावत्या सतवंती गेल्याने मोहारे कुटुंबीय आर्थिक अडचणीत आले आहे. ‘लोकमत’मध्ये ही बातमी प्रसिद्ध होताच, दीपक शिकत असलेल्या मुंडीपार येथील शाळेतील शिक्षकांनी तालुका गटशिक्षणाधिकारी एस.जी. वाघमारे व शिक्षणाधिकारी राजकुमार हिवारे यांना माहिती दिली व परिवाराला आर्थिक मदतीचे आवाहन केले. यावर शिक्षणाधिकारी राजकुमार हिवारे यांनीही तालुका व जिल्ह्यातील शिक्षकांना मोहारे परिवारास मदत करण्याचे आवाहन केले, त्याला शिक्षकांनीही प्रतिसाद दिला. याप्रसंगी सालेकसा तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी एस.जे.वाघमारे, गटसमन्वयक बी.डी. चौधरी, समाजसेविका सविता बेदरकर, वशिष्ट खोब्रागडे, जिजाऊ ब्रिगेड आमगावच्या जयश्री ताई पुंडकर, मुख्याध्यापक टी.एफ. बरैय्या, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रदीप मोहारे, उपाध्यक्ष लतेश उपराडे, शिक्षक व्ही.एस. मानकर, जे.जी. बल्हारे, एम.एस. मोहारे, डी.बी. बोपचे, एच.एम. अहमद उपस्थित होते.
.........
शिक्षक आले मदतीला आले धावून
डॉ.सविता बेदरकर यांनी शुक्रवारी (दि.१८) मोहारे परिवाराची सांत्वना भेट घेऊन, त्यांना ५० किलो तांदूळ, १० किलो गहू, १ पिंप खाद्यतेल, २ किलो चणे, तूरडाळ व इतर सर्व किराणा सामान भेट दिले. जिजाऊ ब्रिगेडच्या जयश्री पुंडकर यांनी ५०० रुपये रोख दिले. मुख्याध्यापक, गटशिक्षणाधिकारी व शिक्षणाधिकारी यांच्या आवाहनाला तालुक्यातील शिक्षकांनी प्रतिसाद देत, केलेल्या आर्थिक मदतीचा १५,००० रुपयांचा धनादेश गीता मोहारे हिला सुपुर्द केला. अजून मदत जमा होत आहे, ती लहान मुलगी दिव्या हिच्या नावे सुपुर्द करण्याची हमी मुख्याध्यापकांनी मोहारे परिवाराला दिली.
........