राजीव फुंडे
कालीमाटी : मारबत हालकण्यासाठी गेलेली गावातील चार मुले नदीच्या पाण्यात वाहून गेल्याने गावातील घराघरांत शोककळा पसरली. माहिती मिळताच गावकरी नदीच्या दिशेने पळाले. उशिरापर्यंत त्या मुलांचा काहीच पत्ता न लागल्याने अवघे गाव दु:खात लोटले. गावातील तरुण मुले वाहून गेल्याच्या घटनेमुळे मारबतचा उत्साह विरून गेला व कालीमाटीवासीयांना अन्न-पाणी कडू झाले.
आमगाव तालुक्यातील कालीमाटी हे गाव तीन हजार लोकसंख्या असलेले गाव आहे. विविध जाती-धर्माचे लोक या गावात गुण्या-गाेविंदाने राहतात. सण, उत्सव, मेळावे, समाजातील चालीरीती व परंपरा एकोप्याने साजरी करतात. तान्हा पाेळ्याचा दिवस मारबत म्हणून साजरा करताना गावातील शेकडो मुले ‘घेऊन जागे मारबतचा’ जल्लाेष करीत घरातून गावातील शिवारावर गेली. परंतु, नदीत घडलेल्या घटनेमुळे दहशत घेऊन काही मुले घरी परतली, तर काही लोक नदीकाठावर राहून मदतीची याचना करीत होते.
गावातील तरुण चार मुले नदीत वाहून गेली व उशिरापर्यंत त्यांचा काहीच पत्ता न लागल्याने अवघ्या गावातच शोककळा पसरली होती. आता माहिती मिळणार हीच धाकधूक मनात ठेवून कालीमाटीवासी व वाहून गेलेल्या मुलांचे कुटुंबीय टक लावून बसले होते. सणाचा दिवस दु:खात बदलला व घराघरांत शिजलेले अन्न कुणाच्याही पोटात गेले नाही. दिवसभर जो-तो या घटनेवर दु:ख व्यक्त करीत होता. नदीत अंघोळ करायला गेलेली मुले सुखरूप घरी न परतल्याने घरातील सर्वजण आक्रोश करीत अश्रू ढाळत होते. पोळ्याच्या दिवशी घडलेल्या या घटनेमुळे कालीमाटी व परिसरातील गावेही दु:खात बुडाली होती व सर्वत्र शांतता पसरली होती. ऐकू येत होता तो फक्त त्या चार मुलांच्या घरातील सदस्यांच्या ढसाढसा रडण्याचा आवाज.