लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोंदिया जिल्ह्यात या विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झाला. जिल्ह्यातील चारपैकी एकही जागा कायम ठेवण्यात काँग्रेसला यश आले नाही. त्यामुळे जिल्ह्यातून काँग्रेस प्रथमच भुईसपाट झाली. सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीतील यशाने काँग्रेसला हुरूप आला होता व कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला होता; पण हा उत्साह विधानसभा निवडणुकीत कायम ठेवण्यात काँग्रेसला अपयश आले. त्यामुळेच जिल्ह्यात काँग्रेस पक्षाच्या झालेल्या पाणीपतवर काँग्रेस नेते मंथन करणार का असा सूर राजकीय वर्तुळात निकालानंतर उमटत आहे.
सन १९७८ पासून झालेल्या विधानसभा निवडणुकांवर नजर टाकल्यास प्रत्येक निवडणुकीत जिल्ह्यात काँग्रेसचे वर्चस्व कायम राहिले. चार मतदारसंघापैकी कधी दोन तर कधी तीन जागांवर काँग्रेस विजय प्राप्त केला होता. त्यातच गोंदिया विधानसभा मतदारसंघ हा तर काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. या मतदारसंघात आतापर्यंत झालेल्या निवडणुकांमध्ये काँग्रेस, शिवसेना वगळता भाजपचा कधी विजय झाला नव्हता; पण या निवडणुकीत भाजपचे आ. विनोद अग्रवाल यांनी ६१ हजार मतांनी विजय प्राप्त करून या मतदारसंघात प्रथमच कमळ फुलवित इतिहास रचला. आमगाव मतदारसंघात गेल्या निवडणुकीत काँग्रेसचे वर्चस्व होते. या निवडणुकीत काँग्रेसने विद्यमान आ. सहषराम कोरोटे यांचे तिकीट कापत अत्यंत नवखा चेहरा राजकुमार पुराम यांना उमेदवारी देण्याचा अति आत्मविश्वासाने प्रयोग केला. हा प्रयोगसुध्दा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा फसला. तर अर्जुनी मोरगाव मतदारसंघात स्थानिक पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या प्रचंड विरोधानंतरही मतदारसंघाबाहेरील चेहरा दिला.
प्रचाराचा शेवटच्या टप्प्यात काँग्रेसने अंतर्गत वादावर पडदा टाकून एकदिलाने काम केले; पण तोपर्यंत बरेच पाणी वाहून गेले होते तर मतदारांमध्ये जो संदेश जायचा तो गेलाच. मतदारांनी मतदारसंघाबाहेरील चेहरा नाकारला. त्यामुळे काँग्रेसने केलेले हे दोन्ही प्रयोग फसले. तर गोंदिया विधानसभा मतदारसंघात विकास आणि कंत्राटदार नावावर केलेला प्रचारसुध्दा मतदारांना भावला नाही. उलट मतदारांनी या मतदारसंघाचे आ. विनोद अग्रवाल यांच्यावर गेल्या निवडणुकीपेक्षा अधिक विश्वास व्यक्त करीत ६१ हजार मताधिक्यांनी निवडून दिले. यातून जो संदेश जायचा तो गेलाच पण यातून आता काँग्रेस नेमका काय बोध घेते हे देखील महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
पराभवानंतर अंतर्गत खदखद बाहेर गोंदिया जिल्ह्यात काँग्रेसच्या पराभवला केवळ प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा आत्मविश्वास असल्याची टीका आता काँग्रेसमधून होऊ लागली आहे. कालपर्यंत पटोलेंच्या सतत आजूबाजूला असणारेच आता त्यांच्यावर टीका करीत त्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न करीत आहे. तर काही काँग्रेसचे प्रामाणिक कार्यकर्ते नानाभाऊंचे चुकलेच असे खासगीत बोलू लागले आहे. त्यामुळे जिल्ह्यात काँग्रेसचे पाणीपत झाल्यानंतर अंतर्गत खदखद बाहेर येऊ लागली आहे.
सहषराम कोरोटे प्रचारांपासून दूरच आमगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आ. सहषराम कोरोटे यांचे तिकीट पक्षाने ऐनवेळी कापल्याने ते प्रचंड नाराज होते. प्रचारात फिरलो आणि काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव झाला तर त्याचे खापर आपल्यावरच फोडले जाईल त्यामुळे ते प्रचारापासून दूर राहिले. यामुळे मतदारसंघात जो संदेश जायचा तो गेलाच व नवख्या चेहऱ्याला संधी देणे काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना अंगाशी आले.
काँग्रेसमध्ये कोण घालणार उत्साहाची फुंकरलोकसभा निवडणुकीतील यशाने जिल्ह्यातील काँग्रेस नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला होता. पण विधानसभेतील पराभवानंतर पुन्हा नैराश्य पसरले आहे. हे नैराश्य दूर करण्यासाठी आता कोण फुंकर घालणार याची चर्चा आहे. विजयाचे जसे भागीदार सर्व भागीदार असतात ते पराजयाचे भागीदार होऊन जिल्ह्यातील काँग्रेसजण पुन्हा एकदिलाने कामाला लागणार का याकडे नजरा लागल्या आहेत.