गोंदिया : एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासून तापमानात सातत्याने वाढ होत आहे. बुधवारी (दि.२०) सलग दुसऱ्या दिवशी गोंदिया जिल्ह्यात ४३.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मागील पंधरा दिवसांतील हे सर्वाधिक तापमान होय. वाढत्या तापमानामुळे दैनंदिन वेळापत्रक बदलले असून, शेतकरीसुद्धा सकाळी ११ वाजेपर्यंत सर्व कामे आटोपून घेत असल्याचे चित्र आहे.
हवामान विभागाने यंदा उन्हाळा चांगलाच तापणार, असा इशारा दिला होता. मार्च महिन्यापासून तापमानात वाढ होण्यास सुरुवात झाली. मार्च महिन्यातच पारा ४० अंशांवर गेल्याने एप्रिल व मे महिन्यात सूर्य चांगलीच आग ओकणार, असा अंदाज व्यक्त केला जात होता. तो काहीसा खरा ठरत आहे. बुधवारी गोंदियाचे तापमान ४३.२ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. पारा वाढत असल्याने दुपारच्या वेळेस शहरातील रस्त्यांवरील गर्दीसुद्धा कमी झाल्याचे चित्र आहे. यंदाचा उन्हाळा चांगलाच तापणार, असे सुरुवातीपासूनच बोलले जात होते. ते अगदी खरे होताना दिसत आहे. एप्रिल महिना लागताच सूर्य आणखी आग ओकू लागल्याने पारा दिवसेंदिवस वाढत आहे. मध्यंतरी ढगाळ वातावरणामुळे थोडाफार दिलासा मिळाला होता. मात्र, क्षणिक दिलासा दिल्यानंतर उन्हाने परत एकदा आपली तीव्रता दाखवून दिली आहे. वाढत्या तापमानामुळे कूलर, पंखेसुद्धा काम करीत नसून त्यातच खंडित वीज पुरवठ्याने भर घातली आहे. उन्हाची तीव्रता बघता, घराबाहेर डोकावून बघताच अंगाचा थरकाप होतो. मात्र, कामामुळे घराबाहेर पडावेच लागते. दुपारच्या उन्हात निघू नका, असा सल्ला आरोग्य विभागाने दिला आहे.