गोंदिया : पावसाळ्याला दीड महिना लोटला असूनही पावसाने पाहिजे त्या प्रमाणात हजेरी लावलेली नाही. परिणामी शेतकऱ्यांसह अवघ्या जिल्हावासीयांचीच धाकधूक वाढली आहे. असे असतानाच मात्र हवामान खात्याने शुक्रवारी (दि.१९) जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा ‘फोरकास्ट’ दिला आहे. आतापर्यंत दमदार पावसाने हजेरी लावली नसल्याने पावसाची गरज असल्याने सर्वांच्या नजरा आता हवामान खात्याच्या अंदाजाकडे लागल्या आहेत.
जिल्ह्यावर यंदा वरूणराज नाराज दिसून येत आहे. हेच कारण आहे की, पावसाळ्याला दीड महिना लोटला असूनही पाहिजे त्या प्रमाणात पाऊस झालेला नाही. जिल्ह्यात पावसाळ्यात सरासरी १२२०.३ मि.मी. पाऊस अपेक्षित आहे. मात्र, आतापर्यंत फक्त सरासरी ३२१.७ मि.मी. एवढाच पाऊस बरसला असून त्याची २६.४ एवढी टक्केवारी आहे. पाऊस नसल्यामुळे आताही जिल्ह्यात बहुतांश शेतकऱ्यांची रोवणी आटोपलेली नाही. असे असतानाच मात्र हवामान खात्याने शुक्रवारी (दि.१९) जिल्ह्याला ‘रेड अलर्ट’ देत काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे तर शनिवारी (दि.२०) ऑरेंज अलर्ट दिला असून त्यातूनही काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तविला आहे.
उकाड्याने जिल्हावासीय हैराणआतापर्यंत पावसाचा जोर वाढलेला नसल्याने उकाडा काही कमी झालेला नाही. परिणामी पावसाळा लागून दीड महिना लोटला असातानाही कुलर व पंख्यांशिवाय राहणे कठीण झाले आहे. जिल्ह्याचा पारा गुरूवारी ३३.२ अंशांवर होता व मागील कित्येक दिवसांपासून पारा ३२-३३ अंशांवर कायम आहे. परिणामी आताही नागरिकांच्या अंगावरून घामाच्या धारा वाहत आहेत.