परशुरामकर : जिल्ह्यातील शेतकरी पावसाअभावी संकटात लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : मे महिन्याच्या शेवटी शासनाच्या अखत्यारीतील हवामान खात्याने मृग नक्षत्राच्या सुरुवातीलाच मोठ्या प्रमाणावर मान्सून सक्रिय झाल्याने पाऊस होईल, असा अंदाज वर्तविला होता. त्यानुसार शेतकरी कामाला लागले. परंतु आजपर्यंत २९२ मिमी पावसाची आवश्यकता असताना जिल्ह्यात फक्त १५० मिमी पाऊस झाल्याने जिल्ह्यातील शेतकरी संकटात सापडलेला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने या प्रकरणाची दखल घेऊन आतापासूनच शेतकऱ्यांना मदत करण्याच्या दृष्टीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जि.प. सदस्य परशुरामकर यांनी केली आहे. जिल्ह्यात सुमारे १.९० लाख हेक्टरमध्ये धानाचे पीक घेतले जाते. जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकरी साधारणत: मृग नक्षत्राच्या मध्यानंतर धानाची पेरणी करतात. पण यावर्षी शासनाच्या अखत्यारीतील हवामान खात्याने व त्याला अनुसरुन प्रसिध्दी माध्यमांनी, मानसून सक्रिय झाल्याने जून महिन्याच्या सुरुवातीलाच चांगला पाऊस होईल, असे भाकीत वर्तविले. त्यानुसार शेतकऱ्यांनी रोपवाटिकेसाठी जमिनी तयार करुन महागडे वान खरेदी केले व नर्सरी टाकली. सुरुवातीला एक-दोन दिवस पाऊस झाला, त्यामुळे काही रोपे उगवली व काही उगवलीच नाही. तसेच जिल्ह्यात इतर भागात पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्याने अजूनपर्यंत पेरणी झालेली नाही. हवामान खात्याच्या अंदाजाप्रमाणे पाऊस झालाच नाही. आजपर्यंत जिल्ह्यात भात शेतीला २९० मिमी. पावसाची आवश्यकता असताना फक्त १५० मिमी. पाऊस झाला, म्हणजे निम्माच पाऊस झाला आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडलेला आहे. काही ठिकाणी उगवलेली नर्सरी पाऊस न झाल्याने करपू लागलेली आहे. त्याठिकाणी शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे. तर काही ठिकाणी पेरणी झालेली नाही. त्या शेतकऱ्यांंना चांगल्या दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. पाऊस आल्यावरच शेतीकामांना गती येऊ शकेल. एकंदरीत पावसाचे प्रमाण पाहता दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने आतापासूनच या बाबीची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य गंगाधर परशुरामकर यांनी जिल्हा प्रशासनाकडे केलेली आहे.
हवामान खात्याचा अंदाज चुकला
By admin | Published: July 09, 2017 12:17 AM