ऑनलाईन लोकमतसडक अर्जुनी : वनपरिक्षेत्र कार्यालय सडक-अर्जुनी अंतर्गत येत असलेल्या सहवनक्षेत्र रेंगेपार येथील बीट क्रमांक १५७१ मध्ये सोमवारी (दि.२६) सकाळी शेताला लागून असलेल्या संरक्षित वनात आग लावताना एकाला रंगेहात पकडण्यात वनविभागाला यश आले. धरमलाल बिसन सलामे (५५) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून त्यांने स्वत:च्या शेताजवळील संरक्षित वनात मोहफुल वेचण्यासाठी जंगलाला आग लावल्याची कबुली दिली.आठवडाभरापूर्वीच नवेगावबांध-नागझिरा अभयारण्यात आग लागल्याने वन संपत्तीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.ही आग तेंदूपत्ता कंत्राटदारांनी तेंदू हंगाम चांगला येण्यासाठी लावल्याची बाब पुढे आली होती. तेंदूपत्ता कंत्राटदारांनी स्व:ताचे हित साधण्यासाठी जंगलात लावल्या आगीचा फटका वनसंपत्तीसह वन्य प्राण्यांना सुध्दा बसला. जवळपास ४ हजार हेक्टरमधील वनसंपत्तीचे यात नुकसान झाले. या प्रकारामुळे वनविभागाच्या उपाय योजना आणि गस्तीवर सुध्दा प्रश्न चिन्ह उपस्थित केले जात होते. दरम्यान सडक-अर्जुनी तालुक्यातील रेंगेपार बीट क्रमांक १५७१ मध्ये आग लावणाऱ्या धरमलाल सलामे यांना अटक केली. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याची चौकशी केली असता त्यांनी मोहफुले वेचण्यासाठी जंगलात आग लावल्याची कबुली दिली. गोंदियाचे सहायक वनसंरक्षक अधिकारी शेख, सडक अर्जुनीचे वनपरिक्षेत्र अधिकारी गोवर्धन राठोड यांचे मार्गदर्शनात चौकशी अधिकारी प्रमोद फुले, क्षेत्र सहायक रेंगेपार जप्ती अधिकारी एस.सी.बघेले, बिट रक्षक दल्ली, क्षेत्रसहायक शैलेंद्र पारधी, वनरक्षक अरविंद बडगे मोगरा, के.एस. भोयर बाम्हणी, जागेश्वर भोंडे, देवानंद कोजबे, वनमजूर, चंद्रशेखर कुरसुंगे हे तपास करीत आहेत.
जंगलात आग लावणारा आरोपी जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2018 12:25 AM