सालेकसा : महावितरण कंपनीद्वारे ७५ लाख वीज ग्राहकांना वीज पुरवठा खंडित करण्याची नोटीस पाठविण्यात आली आहे. महाराष्ट्र सरकारने कोरोना काळातली वाढीव विद्युत बिल माफ करुन वसुली रद्द करण्याची मागणी तालुका भाजप शाखेच्यावतीने करण्यात आली. तसेच याचा निषेध नोंदवून अभियंत्याला निवेदन देण्यात आले.
वाढीव विद्युत बिलाच्या निषेधार्थ सालेकसा तालुका भाजप अध्यक्ष गुणवंत बिसेन आणि महिला मोर्चा अध्यक्ष कल्याणी कटरे यांच्या नेतृत्वात तालुक्यातील शेकडो वीज ग्राहकांनी बुधवारी विद्युत वितरण कार्यालयासमोर धरणे आंदोलन करीत विद्युत विभागातील अभियंत्याला निवेदन दिले. निवेदनातून वीज बिल माफ करण्याची मागणी अनेकदा करण्यात आली. पण त्याची दखल अद्यापही घेण्यात आली नाही. राज्य सरकार सर्वसामान्य वीज ग्राहकांच्या व्यथा समजून घ्यायला तयार नाही. शेजारच्या राज्यामध्ये कोरोना काळातली विद्युत बिले माफ करण्यात आली आहेत. महाराष्ट्रसारख्या पुरोगामी राज्यात वीज बिल माफ का केले जाऊ शकत नाही. कोरोना काळात जवळपास सर्वांचे व्यापार व्यवसाय व मोलमजुरीची कामे सुध्दा बंद होती. त्यामुळे सर्वसामान्य माणसाला व मजूर वर्गाला कोणतेही उत्पन्न मिळाले नाही. त्यामुळे ते विद्युत बिल भरु शकले नाही. त्यावर सरकारने सरासरीपेक्षा जास्त रकमेचे वीज बिल ग्राहकांच्या हातात थाेपविले याचा सर्वसामान्य मजूर वर्गाला मोठा धक्का बसला आहे. ते वीज बिल भरण्यात असमर्थ आहेत. अशात वीज बिल माफ करण्यात यावे अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला. या एक दिवसीय धरणे आंदोलनाला गुणवंत बिसेन, मनोज बोपचे, राजेंद्र बडोले, यादव नागपुरे, शंकर मडावी, बाबा लिल्हारे, अजय वशिष्ट गुमानसिंह उपराडे, परसराम फुंडे, संजू कटरे, कल्याणी कटरे, मधू अग्रवाल, प्रतिभा परिहार, वर्षा बिसेन, अर्चना मडावी, विक्की भाटीया, हेमराज सुलाखे, बाबा परिहार, बाबा दमाहे सहभागी झाले होते.