लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया: जिल्ह्यातील देवरी दलममध्ये १२ वर्षापूर्वी सक्रिय असलेला देवरीच्या दलम कमांडरला १० नोव्हेंबर रोजी गोंदिया पोलिसांनी छत्तीसगडच्या सुकमा येथे जाऊन अटक केली. रमेश ऊर्फ हिडमा मडावी (४५) असे अटक करण्यात आलेल्या नक्षलवाद्याचे नाव असल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक अतुल कुळकर्णी यांनी बुधवारी (दि.११) पोलीस अधीक्षक कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
अपर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांना गुप्त बातमीदाराकडून रमेश ऊर्फ हिडमा मडावी या जहाल नक्षलवाद्याची माहिती मिळाली असता छत्तीसगड राज्यातील नक्षल अति संवेदनशिल सुकमा जिल्ह्यात वावरत असल्याची खात्रीशिर माहीती मिळाल्याने पोलीस उपनिरीक्षक अभयसिंह शिंदे व सी-६० पार्टी देवरी यांचे पथक तयार करुन त्या ठिकाणी पाठविण्यात आले. सुकमा जिल्हा पोलीस, छत्तीसगड यांच्या मदतीने १० नोव्हेंबर रोजी सुकमा जिल्हयातून अटक करण्यात आली.त्याच्यावर गोंदिया जिल्हयातील चिचगड, देवरी, डुग्गीपार येथे विविध गुन्ह्यामध्ये मागील १० वर्षापासून तो फरार होता. नक्षलवादी रमेश ऊर्फ हिडमा मडावी हा सन १९९८-९९ मध्ये नक्षल दलममध्ये भरती झाला होता. त्यानंतर त्याने देवरी दलम मध्ये ए.सी.एम तसेच एल.ओ.एस कमांडर म्हणून काम केले आहे. देवरी दलम मध्ये असताना पोलीस स्टेशन चिचगड अंतर्गत स.दु मगरडोह हद्दीमध्ये पोलीस पथकावर प्राणघातक हल्ला केला होता.
चिचगड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये खून गावकऱ्यांवर हल्ले, सार्वजनिक मालमत्तेची नासधूस असे १० गुन्हे दाखल आहेत. देवरी पोलीस स्टेशन मध्ये सदर आरोपीवर खून , सार्वजनिक मालमत्तेची नासधूस बाबत २ गुन्हे दाखल आहेत. डुग्गीपार पोलीस स्टेशन मध्ये पोलीस पथकासोबत चकमकीचा १ गुन्हा असे याच्यावर १३ गुन्हे दाखल आहेत. सदर कारवाई पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, अपर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, उपविभागीय पोलीस अधिकारी जालींदर नालकुल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या आरोपीला न्यायालयाने पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.