अर्जुनी-मोरगाव : आरक्षणाचे जनक व रयतेचे राजे शाहू महाराज यांनी अस्पृश्य समाजातील लोकांना एकत्र आणले, भेदभाव दूर केला, वसतिगृहात ठेवले, शिक्षणाचा अधिकारही दिला म्हणून डाॅ. बाबासाहेब आंबेडकर व आम्हीही अठरापगड समाजातील नागरिक राजे शाहू महाराजांचा वारसा घेऊनच उच्च विद्याविभूषित बनून पुढे जात आहोत, हे कोणी नाकारु शकत नाही. म्हणूनच दीनदुबळ्या समाजातील अठरापगड जातीतील लोकांचे भाग्यविधाते हे शाहू राजे आहेत, असे प्रतिपादन आंबेडकरी साहित्याचे अभ्यासक मुन्नाभाई नंदागवळी यांनी केले.
शाहू महाराज यांच्या ऑनलाईन स्मृती दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. ऑनलाईन अभिवादन कार्यक्रमाला गुरुदेव रामटेके, के. ए. रंगारी, रामटेके, सी. टी. तिरपुडे आदी मान्यवर उपस्थित होते. हा कार्यक्रम लोककला साहित्य सेवाभावी बहुउद्देशीय संस्था येरंडी-बाराभाटी अंतर्गत परिवर्तनशील साहित्य महामंडळ आयोजित करण्यात आला. यात महाराष्ट्रातून अनेक नागरिक सहभागी झाले होते. ऑनलाईन अभिवादन कार्यक्रमाचे संचालन व आभार एस. बी.बोरकर यांनी केले.