संतोष बुकावन।लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी-मोरगाव : कृषी विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या उन्नत शेती समृध्द शेतकरी अभियानांतर्गत निवड होऊन ट्रॅक्टर खरेदी केलेल्या शेतकऱ्यांना गेल्या पाच महिन्यांपासून अनुदान मिळाले नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे.शेती हा आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. राज्यातील जनता शेती व्यवसायावर अवलंबून आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याचे शासनाचे ध्येय आहे. यासाठी राज्य शासनाने उन्नत शेती समृध्द शेतकरी हे महत्वाकांक्षी अभियान सुरू केले आहे. सर्वत्र मजुरांची मोठी टंचाई व जलदगतीने कामे होण्याच्या दृष्टीने बैलांऐवजी ट्रॅक्टरचलीत औजारांचा वापर वाढला आहे. या अंतर्गत शासनाने शेतकऱ्यांना अनुदानातून ट्रॅक्टर देण्याचा धाडसी निर्णय घेतला आहे.मात्र योजना राबविणारी यंत्रणा पोखरलेली असल्यामुळे फज्जा उडतांना दिसून येत आहे.बाराभाटी येथील राकेश विरेंद्र पिहरे यांनी शासनाच्या उन्नत शेती समृध्द शेतकरी या योजनेंतर्गत ट्रॅक्टर खरेदीसाठी प्रस्ताव टाकला. संबंधित विभागाने मौका तपासणी केल्यानंतर त्यांची २०१८ - १९ या वर्षात ट्रॅक्टर खरेदीसाठी निवड झाली. १८ जानेवारी रोजी निवडीचे कृषी विभागाकडून पत्र मिळाले. अर्जुनी मोरगावच्या तालुका कृषी अधिकाºयांनी त्यांना ट्रॅक्टर खरेदीसाठी १५ फेब्रुवारीच्या आदेशान्वये पूर्व संमती प्रदान केली. त्यानुसार पिहरे यांनी के.एम.ट्रॅक्टर्स सौंदड यांचेकडून १८ फेब्रुवारी रोजी मॅसे फर्र्ग्युसन कंपनीचा ट्रॅक्टर खरेदी केला. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना १ लाख २५ हजार रु पये अनुदान देण्याचे प्रस्तावित आहे. तसे पूर्व संमतीपत्रात नमूद आहे. मात्र गेल्या पाच महिन्यांपासून त्यांना अनुदानाची रक्कम मिळाली नाही. तालुका कृषी कार्यालयात गेले तर जिल्हा कार्यालयात जाण्याचा उपदेश केला जातो.जिल्हा कार्यालयात गेले तर तुमची फाईलच आली नसल्याचे सांगण्यात येते. अनुदानासाठी त्यांनी तालुका व जिल्हा कृषी कार्यालयाचे उंबरठे झिजविले. मात्र अद्याप न्याय मिळाला नाही.हे प्रकरण हेतुपुरस्सर अर्जुनी मोरगाव कृषी कार्यालयात प्रलंबित असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. संपूर्ण दस्तावेज असताना अनुदान अडविण्याचे कोडेच आहे. शेतकऱ्यांना नेहमीच या ना त्या कारणावरून नागविले जाते. यावर्षी अल्पवृष्टीमुळे शेतकरी संकटात आहे. दुबार पेरणीची समस्या आहे. ट्रॅक्टरच्या हप्त्याची चिंता आहे.सोबतच कौटुंबिक खर्च आहेत. त्यात विभागाने अनुदान अडवून ठेवले आहे. हे पैसे वेळेवर मिळाले असते तर ट्रॅक्टरचा हप्ता देऊन व्याजाची आकारणी कमी होऊ शकली असती.अनुदानासाठी दिरंगाई होत असल्याने एवढे व्याज कृषी विभागाने द्यायला हवा असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. याचप्रकारे अनेक शेतकºयांचे अनुदानाचे पैसे अडले आहेत. जे शेतकरी पैसे मोजतात त्यांचेच अनुदानाचे प्रस्ताव जिल्हा कार्यालयाकडे पाठविले जातात अशी शेतकºयांची ओरड सुरू आहे.या वर्षात अनुदान देऊ -तुमडामअर्जुनी मोरगाव तालुक्यातून २०१८-१९ या आर्थिक वर्षात ट्रॅक्टर खरेदीसाठी २१२ प्रस्ताव मंजूर झाले. यापैकी अनुसूचित जाती जमातीच्या ५० तर इतर मागासवर्गीयांच्या १०० असे एकूण १५० शेतकºयांना अनुदान देण्यात आले आहे. अनुदान वाटपासाठी राशी कमी पडल्याने सुमारे ६२ शेतकऱ्यांना अनुदान देण्यात आले नाही. यावर्षी २ कोटी रु पये मंजूर झाले आहेत. या निधीतून उर्वरित शेतकऱ्यांचे अनुदान देण्यात येईल,अशी माहिती तालुका कृषी अधिकारी डी.एल.तुमडाम यांनी लोकमतशी बोलतांना दिली.शंकाकुशंकांना ऊतहे प्रस्ताव २०१८-१९ या आर्थिक वर्षातील आहेत.ट्रॅक्टर खरेदीसाठी याच वर्षाच्या निधीतून खर्च करण्यात आला.आर्थिक वर्ष ३१ मार्चला संपले.हा कालावधी केव्हाच संपला. आता २०१९-२० हे आर्थिक वर्ष सुरू झाले आहे. ट्रॅक्टर खरेदीसाठी २०१८-१९ हे वर्ष तर त्याच खरेदीच्या अनुदानासाठी २०१९-२० चा निधी हा संशोधनाचा विषय आहे. २०१८-१९ या आर्थिक वर्षात ट्रॅक्टर खरेदीसाठी निधी उपलब्ध नव्हता तर अधिकच्या एवढ्या ट्रॅक्टरची खरेदी करण्याची गरजच काय? यात कुठेतरी पाणी मुरत असल्याची शंका व्यक्त केली जात आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
उन्नत शेती-समृद्ध शेतकरी योजनेचा फज्जा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2019 10:10 PM
कृषी विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या उन्नत शेती समृध्द शेतकरी अभियानांतर्गत निवड होऊन ट्रॅक्टर खरेदी केलेल्या शेतकऱ्यांना गेल्या पाच महिन्यांपासून अनुदान मिळाले नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
ठळक मुद्देट्रॅक्टर अनुदानापासून शेतकरी वंचित : कृषी विभागाचा अजब कारभार