गोंदिया : शासकीय योजनेचा तांदूळ काळ्या बाजारात विक्रीसाठी नेणारे वाहन गोंदिया ग्रामीण पोलिसांनी २३ एप्रिलच्या रात्री ११.१० वाजता पकडला. त्या वाहनातून १ लाख ८५ हजार रुपये किमतीचा शासकीय तांदूळ व त्या तांदूळ वाहून नेणारा ट्रक जप्त करण्यात आला. ही कारवाई पोलिस निरीक्षक सचिन म्हेत्रे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.
काहीजण छोटा हत्ती टिप्पर वाहन क्रमांक एमएच ३५ एजे १०७१ मध्ये चोरीचा तांदूळ गोंदियाकडून गोरेगावकडे घेऊन जात असल्याची गुप्त ग्रामीण पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच पोलिस निरीक्षक सचिन म्हेत्रे यांनी रात्रगस्तीवरील आपल्या अधिनस्त पोलिसांना घटनास्थळी पाठविले. तांदूळ चोरी करून घेऊन जाणाऱ्या वाहनाचा शोध घेऊन कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. पोलिस निरीक्षक म्हेत्रे हे स्वतः कारवाई करण्यासाठी रवाना झाले.
पोलिसांना शासकीय वाहनासह किंजल राईस मिलजवळ ढिमरटोली येथे पोहोचण्याच्या सूचना दिल्या. पोलिस स्टाफसह फूडलैंड हॉटेल, ढिमरटोली येथे नाकाबंदी करून गोंदियाकडून गोरेगावकडे जाणाऱ्या वाहनाला थांबवून तपासणी केली असता या वाहनाच्या मागील डाल्यामध्ये ९ व कॅबिनमध्ये ०२ असे एकूण ११ इसम बसल्याचे आढळले. या वाहन क्रमांक एमएच ३५ एजे १०७१ चा चालक सुधीर हंसराज शहारे (३५, रा. मुंडीपार) याला छोटा हत्ती (टिप्पर) मध्ये भरलेल्या मालाबाबत विचारणा केली असता त्याने टिप्परच्या डाल्यात तांदूळ असल्याचे सांगितले. कॅबिनमध्ये बसलेला धर्मेंद्र मारबदे (रा. ढिमरटोली)च्या मदतीने चोरून मुंडीपार येथे घेऊन जात असल्याचे सांगितले.
मनीष महेंद्र शेंडे (३०, रा. कुऱ्हाडी) असे सांगून टिप्परच्या मागे मालावर बसलेले लोक हमाल असल्याचे सांगितले. बम्लेश्वरी गोडाऊन, मिलटोली येथील संजय डोमळे व धर्मेंद्र मारबदे यांच्या मदतीने गोदामातील प्रत्येकी ५० किलो वजनाचे १८५ कट्टे तांदूळ चोरल्याचे सांगितले. टिप्परमध्ये भरलेल्या मालाची तपासणी केली असता प्रत्येक कट्ट्यावर लावलेल्या लेबलवरील डीसीपीएस स्किम, डीएमओ गोंदिया लॉट नं. १८ जय बम्लेश्वरी राईस मिल, फुलचूर, गोंदिया महाराष्ट्र शासन असा मजकूर लिहिलेला होता. तो तांदूळ शासकीय योजनेचा असल्याचे आढळले.
या आरोपींवर गुन्हा दाखल
टिप्परमधील तांदूळ हा चोरीचा असल्याचे स्पष्ट झाल्याने पोलिस निरीक्षक सचिन म्हेत्रे यांनी टिप्परमधील तांदळाचे प्रत्येकी ५० किलो वजनाचे १८५ कट्टे किंमत १ लाख ८५ हजार रूपये तसेच टिप्पर क्रमांक एमएच ३५ एजे १०७१ किंमत १० लाख रूपये असा एकूण ११ लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. बम्लेश्वरी गोदाम ढिमरटोली येथून शासकीय तांदूळ चोरी करणाऱ्या आरोपीत मनीष महेंद्र शेंडे (३०, रा. कुऱ्हाडी), सुधीर बेसराज शहारे (३५, रा. मुंडीपार), संजय डोमळे (रा. मिलटोली), धर्मेंद्र मारबदे (रा. ढिमरटोली) यांच्यावर गोंदिया ग्रामीण पोलिसात भादंवि कलम ३८०, ३८१, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. चारही आरोपींना अटक करण्यात आली आहे.
यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलिस अधीक्षक अशोक बनकर, उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील ताजने यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक सचिन म्हेत्रे यांच्या नेतृत्वात परिवेक्षाधीन पोलिस उपनिरीक्षक रवी कवडे, पोलिस हवालदार कोकोडे यांनी केली आहे.