गोंदिया : शहराच्या रेलटोली येथील रिलिस रेस्टॉरंटसमोर ठेवलेल्या दुचाकींवर पेट्रोल टाकून चार वाहने जाळल्याची घटना १६ जानेवारीच्या पहाटे ४ वाजता घडली. दुचाकींवर पेट्रोल टाकून जाळणारे दोघे हे एका दुकानातील सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्यात कैद झाले. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
रिलिस रेस्टॉरंटमध्ये किचन हेल्पर म्हणून काम करणारे जितेंद्र दुर्गाप्रसाद जामुनपाने (२६), रा. निलागोंदी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांची मोटारसायकल एमएच ३५ ए.क्यू. ३४७० ही अरोरा मशीनरी दुकानाच्या समोरील मोकळ्या जागेत हॉटेलजवळील मोकळ्या जागेत ठेवली होती. १६ जानेवारीच्या पहाटे ४ वाजता जितेंद्र जामुनपाने यांचा मित्र कैलाश याने रिलिस हॉटेलमध्ये जाऊन जितेंद्रला उठविले. तुझी मोटारसायकल व इतर तीन मोटारसायकली जळत असल्याचे सांगितले. त्या ठिकाणी जाऊन पाहिल्यावर चार मोटारसायकल जळत होत्या. अरोरा मशीनरी दुकानाच्या समोरील शटर रूममध्येसुद्धा आग लागली होती.
जितेंद्र जामुनपाने, रूपेश सूर्यभान भावे, मदन किसान व रिलिस रेस्टॉरंटमध्ये काम करणाऱ्या मुलांनी पॅसिफिक हॉटेलमधील पाण्याच्या पाइपने त्या आगीवर नियंत्रण आणले. त्यानंतर सकाळी पॅसिफिक हॉटेलचे मालक झवर जेठालालभाई चावडा, रा. रेलटोली गोंदिया यांनी गाड्यांना लागलेल्या आगीमुळे नुकसान झाले म्हणून या घटनेची माहिती पोलिस ठाणे रामनगर येथे दिली होती. जितेंद्र जामुनपाने यांच्या तक्रारीवर अज्ञात दोन आरोपींवर रामनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या आगीत दोन लाखांचे नुकसान झाले आहे.
सीसीटीव्हीत झाले दोन आरोपी कैद
ही आग कशाने लागली म्हणून अरोरा मशीनरी दुकानातील सीसीटीव्ही फुटेज पाहिले असता दोन अनोळखी व्यक्ती तोंडाला कापड बांधून आल्या. त्यापैकी एकाने ज्वलनशील पदार्थ मोटारसायकलवर टाकून आग लावल्याचे दिसले.
या मोटारसायकली जळाल्या
जितेंद्र जामुनपाने यांची मोटारसायकल एमएच ३५ एक्यू ३४७०, रूपेश सूर्यभान भावे यांची एम.एच. ३५ एक्यू २७०२, एमएच ३५ वाय २५१४, एम.पी.५० एम.एम.२२५१ अशा चार गाड्या जळून खाक झाल्या.
दाेन आरोपींवर गुन्हा दाखल
या चार मोटारसायकलवर पेट्रोल टाकून आग लावणारे ते दोघे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. त्यांची ओळख पटवून त्यांना अटक करण्याची कारवाई रामनगर पोलिस करीत आहेत. या तपासासाठी रामनगरचे ठाणेदार संदेश केंजळे यांनी कर्मचाऱ्यांची पथके तयार केली आहेत.
हॉटेलातच झोपले होते कर्मचारी
रिलिस हॉटेलमध्ये काम करणारे कर्मचारी व जितेंद्र जामुनपाने थंडी असल्यामुळे रात्री ११ वाजेनंतर गावाला जाणे सोयीस्कर वाटत नाही म्हणून हॉटेलातच झोपले असल्याने इतरांनी त्यांना वेळीच माहिती दिली.