लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : दिवाळीचा सण होताच आप्तस्वकीयांच्या घरी भेट देण्यासाठी किंवा घर बंद करून भ्रमंती करायला गेलेल्या लोकांच्या बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी अडीच लाखांचा माल पळविला. गोंदिया शहरात २९ ऑक्टोबरच्या पहाटे चार ठिकाणी घरफोडी केली. तर दोन ठिकाणी घरफोडीचा प्रयत्न करण्यात आला. या घटनांची नोंद गोंदिया शहर व रामनगर पोलिसांनी घेतली आहे.गोंदिया शहर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या साई नगरातील संतोष सुरसे यांच्या घरी भाड्याने राहणारे परमानंद भय्यालाल गायधने (४५) रा. जवरी, ता. आमगाव यांच्या खोलीतून ५५ हजार रुपये रोख पळविली. मुलीच्या पिगी बॅंकेमध्ये ठेवलेले ५ हजार व आलमारीत ठेवलेले ५० हजार रुपये रोख असा माल पळवून नेला. परमानंद गायधने हे आपल्या कुटुंबासह २६ ऑक्टोबर रोजी जवरी या आपल्या स्वगावी गेले होते. २९ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजता ते परतल्यावर त्यांच्या खोलीवर चोरी झाल्याचे उघडकीस आले. त्यांचे ठेवलेले दागिने दुसरीकडे असल्यामुळे ते चोरट्यांच्या हातात लागले नाहीत. परिणामी ते दागिने वाचले. दुसरी घटना गोंदियाच्या गौशाला वाॅर्डातील आसाराम बापू आश्रमाजवळ घडली. पैकनटोली येथील सुरेश खुमान डोहरे (३५) या भाजीविक्रेत्याच्या घरून ६१ हजार ८०० रुपयांचे दागिने पळविले. ते आपल्या कुटुंबासह जावयाला घेऊन हरिव्दार येथे देवदर्शनासाठी गेले असताना २८ ते २९ ऑक्टोबरच्या रात्रीदरम्यान अज्ञात चोरट्यांनी एमएच ३५ ए.एस. ७७४५ मोटारसायकल किंमत ४० हजार, एक जोड सोन्याचे झुमके किंमत २ हजार, चांदीची साखळी, चांदीचा गुच्छा, जोडवे, ११ नग चांदीचे सिक्के व १५ हजार रुपये रोख असा एकूण ६१ हजार ८०० रुपयाचा माल पळविला. तिसरी घटना रामनगर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या अरिहंत कॉलनी कुडवा येथील आहे. डॉ. तुषार प्रकाश पारधी (२५) यांच्या घरून ५५ हजार रुपये रोख, ६ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, आदर्श कॉलनी कुडवा येथील नत्थू सीताराम जामवंत (६३) यांच्या घरून एमएच ३५ एएफ ६९६४ ही किंमत ९ हजार रुपयाची मोटरसायकल पळविली. या चारही घटनांची नोंद संबंधित पोलीस ठाण्यात घेण्यात आली आहे.
बंद घरांवर चोरट्यांची नजर - दिवाळी झाल्यावर अनेक जण देवदर्शनाला किंवा स्वगावी जातात. या दरम्यान घर बंद असल्याचा गैरफायदा चोरटे घेत असतात. बंद दार असलेले घर पाहून आरोपी ते घर साफ करण्यासाठी टपून बसलेले असतात. तेव्हा दिवाळीला गावी जाताना शेजाऱ्यांना किंवा नजीकच्या पोलीस ठाण्यात याची माहिती दिल्यास ते हितावह ठरेल.
दोन घरी चोरीचा प्रयत्न- रामनगर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या अरिहंत कॉलनी कुडवा येथील राजेंद्र आर लिल्हारे व युवराज बालू गायधने या दोघांच्या घरी अज्ञात आरोपींनी चोरीचा प्रयत्न केला. परंतु लोकांचा आवाज ऐकून आरोपी पसार झाले.ही घ्या काळजी- दिवाळीच्या काळात कष्टाने कमावलेले दागिने, पैसे चोरट्यांच्या हाती पडू नयेत यासाठी नागरिकांनी दक्षता घेण्याची गरज आहे. बाहेरगावी जाताना शेजाऱ्यांना घराकडे लक्ष ठेवायला सांगावे, दाराला कुलूप लावून तसेच खिडक्या व गॅलरीचे दरवाजे बंद करून ठेवावेत, असा सल्लासुध्दा दिला होता.