गोंदिया: आजघडीला प्रत्येकच कामासाठी आधारकार्ड अत्यंत महत्वाचे बनले असून आधारकार्डची मतदार कार्डशी जोडणी करण्याबाबत भारत निवडणूक आयोगाकडून ४ जुलै २०२२ रोजी पत्र काढण्यात आले आहे. आता जिल्ह्याची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाली असूनही अद्याप तीन लाख ९८ हजार ४३६ मतदारांनी त्यांच्या मतदार ओळखपत्राची आधारकार्डशी जोडणी केली नसल्याचे उघडकीस आले आहे.
सन २०२४ हे वर्ष निवडणुकीचे वर्ष राहणार असून अगोदर लोकसभा व त्यानंतर विधानसभा व अन्य काही निवडणुका लागणार असल्याची शक्यता आहे. त्यानुसार, लोकसभा निवडणुकीला घेऊन शासनाकडून तयारीला सुरूवात झाली आहे. यात जिल्हा प्रशासनही मागे नसून जिल्ह्यातही लोकसभा निवडणुकीची प्रशासनाकडून तयारी सुरू झाल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे, त्यादृष्टीने २३ जानेवारी २०२४ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये जिल्ह्यात एकूण १० लाख ८५ हजार २७२ मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे. या मतदारांना त्यांचे मतदार ओळखपत्र आधारकार्डशी जोडणी करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने ४ जुलै २०२२ रोजी पत्र काढले आहे. त्यानुसार, जिल्हा प्रशासनाकडून कार्यवाही सुरू असून आतापर्यंत जिल्ह्यातील सहा लाख ८६ हजार ८३६ मतदारांनी त्यांचे मतदार ओळखपत्र आधारकार्डशी जोडणी केले आहे. याची ६३.२९ एवढी टक्केवारी आहे. मात्र आश्चर्याची बाब अशी की, अद्याप तीन लाख ९८ हजार ४३६ मतदारांनी त्यांचे मतदार ओळखपत्र आधारकार्डशी जोडलेले नसल्याचेही दिसत आहे.
जोडणीत अर्जुनी-मोरगाव मतदार संघ आघाडीवरजिल्ह्यात चार विधानसभा मतदार संघ असून मतदार ओळखपत्र आधारकार्ड सोबत जोडणीत गोंदिया विधानसभा मतदार संघ पिछाडीवर दिसून येत आहे. कारण, गोंदिया विधानसभा मतदार संघातील सर्वाधिक एक लाख ३१ हजार १०५ मतदारांची कार्ड जोडणी अद्याप झालेली नसल्याचे दिसून येत आहे. तेथेच मात्र अर्जुनी-मोरगाव विधानसभा मतदार संघ आघाडीवर असून येथील सर्वात कमी ८४ हजार ६८ मतदारांनी कार्ड जोडणी केली नसल्याचे दिसत आहे.
कार्ड जोडणीची कार्यवाही सुरूमतदार ओळखपत्र आधारकार्डशी जोडण्याबाबत भारत निवडणूक आयोगाने ४ जुलै २०२२ रोजी पत्र काढले आहे. त्यानुसार, जिल्हा प्रशासनाकडून मतदारांकडून ऐच्छिकपणे आधारची माहिती संग्रहित करण्याची मोहीम सुरू आहे. अशात ज्या मतदारांनी अद्याप कार्ड जोडणी केलेली नाही त्यांनाही कार्ड जोडणी करता येणार आहे.
कार्ड नोंदणीचा मतदार संघ निहाय तक्ता
विधानसभा मतदार संघ- जोडणी झालेले मतदार- जोडणीसाठी शिल्लक मतदार
-अर्जुनी-मोरगाव (६३)- १,६८,७७१- ८४,०६८
-तिरोडा (६४)- १,६३,५०७-९९,१५६
-गोंदिया (६५)- १,७७,८८०- १,३१,१०५
- आमगाव (६६)- १,७६,६७८- ८४,१०७