मायलेकींना पुरात जलसमाधी : शासनाच्या वतीने दाखविली तत्परतासालेकसा : पुरात वाहून मृत्युमुखी पडलेल्या मायलेकीच्या कुटुंबाला शासनाकडून चार लाखांची मदत देण्यात आली. शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागांतर्गत देण्यात आलेली ही रक्कम चेक स्वरुपात सालेकसाचे तहसीलदार प्रशांत सांगळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. तहसीलदार सांगळे यांनी बाबुलाल बिलोनेच्या घरी जाऊन मदतीचा चेक दिला. यावेळी माजी पं.स. सभापती बाबुलाल उपराडे, बिंझाली येथील सरपंच सुलोचना रिषीलाल लिल्हारे आदी उपस्थित होते. कुआढास नाल्याला आलेल्या पुरात भुमेश्वरी बिलोने आपल्या दोन मुलींसह वाहुन गेली होती. त्यात तिचा आणि एका मुलीचा मृत्यू झाला तर दुसऱ्या मुलीला वाचविण्यात यश आले होते. या प्रकरणानंतर तरी नाल्यावर पूल बांधावा, अशी मागणी केली जात आहे. देवदूत विजय ढेकवारचा सत्कार सालेकसा : बिंझली येथील चार वर्षिय मुलगी जयश्री बिलोने हिला वाहत्या पाण्यात उडी घेऊन वाचविणाऱ्या २६ वर्षीय विजय ढेकवारचा सालेकसा येथील कमला बहुउद्देशिय शैक्षणिक संस्थेच्यावतीने सत्कार करण्यात आला. विस्तारित समाधान शिबिरादरम्यान सालेकसाचे तहसीलदार प्रशांत सांगळे यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह देऊन त्याला गौरविण्यात आले. यावेळी जि.प. समाज कल्याण सभापती देवराज वडगाये, पं.स. सालेकसाचे सभापती हिरालाल फाफनवाडे जि.प. सदस्य वियज टेकाम, संस्थेचे अध्यक्ष शंकर भदाडे, सचिव गणेश् भदाडे उपस्थित होते. विशेष म्हणजे विजयच्या या कामगिरीने ‘लोकमत’ने लक्ष वेधून त्याचे हे कार्य सर्वांसमोर आणले होते. त्याचा शासनाने यथोचित सत्कार करावा अशी अपेक्षा व्यक्त केली होती. त्याची दखल घेत शासनाने त्याला सन्मानित केले. कुआढास नाल्यावर यापूर्वीसुद्धा अनेक अपघात झाले आहेत. काही लोकांना पुराच्या पाण्यात जलसमाधी मिळाली. मात्र तेथे पूल उभारण्याच्या कामासाठी अद्याप कोणीही पुढाकार घेतला नाही. ही २० वर्षांपासूनच मागणी आता पूर्ण करणे अपेक्षित आहे.
‘त्या’ पीडित कुटुंबाला चार लाखांची मदत
By admin | Published: October 07, 2015 12:23 AM