गोंदिया : शहरातील सावराटोली परिसरात मुले चोरणाऱ्या टोळीच्या चार सदस्यांना नागरिकांनी पकडून गोंदिया शहर पोलिसांच्या स्वाधीन केले. ही घटना शुक्रवारी (दि. ७) सकाळी १० वाजता घडली. त्यांच्याजवळ कुणी बालके आढळली नसली तरी त्या आरोपींनी ६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५.२५ वाजता सावराटोली येथून एका १२ वर्षीय बालकाचा अपहरण करण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा आहे. नागपूर येथील विविध गुन्ह्यांत समावेश असलेल्या या चार आरोपींना गोंदिया शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
गोंदिया शहरातील गोशाला वॉर्डातील एक १२ वर्षीय मुलगा ६ ऑक्टोबर रोजी शिकवणी वर्गासाठी सायकलने जात होता. गुरुवारी सायंकाळी हलका पाऊस आल्याने सुरेश चौक गल्लीत शांतता होती. या रस्त्यावरून तो बालक आपल्या शिकवणीकरिता जात असताना दोन आरोपींनी त्याला पकडून सोबत चल अन्यथा कुऱ्हाडीने मारून ठार करू, अशी धमकी दिली होती. आरोपीने कमरेत कुऱ्हाड लपवून ठेवली होती. त्या दोघांसोबत मुलाने ओढताण करून सुटका करून घेण्याचा प्रयत्न केला. याचवेळी याच रस्त्याने चार-पाच मजूर सब्बल घेऊन कामावरून घरी परतत असताना आरोपींनी त्यांना पाहून त्या ठिकाणातून पळ काढला. त्या मुलाने मजुरांना पाहिल्यावर हे तर आपल्याला पकडणार नाहीत म्हणून सायकल घेऊन तो पळून लागला. काही अंतरावर गेल्यानंतर त्याच्या सायकलची चैन पडली. त्याने साखळी चढवून तो कसाबसा क्लासला पोहोचला. तेथे तो भयभीतच होता. घरी परतल्यानंतर याची माहिती त्याने आपल्या वडिलाला दिली. वडील मुलाला घेऊन गोंदिया शहर पोलीस ठाण्यात रात्री ८.३० वाजता आले. पोलिसांना माहिती दिल्यावर पोलिसांनी रात्री येऊन आरोपींची शोधाशोध केली. त्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे शोधण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांच्या हातात काही लागले नाही.
दुसऱ्या दिवशी पुन्हा आले आरोपी
७ ऑक्टोबर रोजी सकाळी १०:३० वाजता त्या आरोपींपैकी तीन आरोपी पुन्हा त्या बालकाच्या घराजवळ गेले असताना त्या आरोपींना त्या बालकाने ओळखले आणि याची माहिती वडिलाला दिली. वडील त्यांना पकडण्यासाठी घराबाहेर येताच आरोपी त्यांना पाहून पळू लागले. परंतु रस्त्यावर असलेल्या लोकांनी त्या आरोपींना पकडून पोलिसांकडे सोपविले.