लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : लोखंडी सळ्या घेऊन नागपूरला जात असलेल्या ट्रक चालकाला मारहाण करून, त्याच्यासह ट्रक पळवून सळ्या काढून चालक व ट्रकला नागभिड येथे सोडण्यात आले होते. देवरी पोलीस ठाण्यांतर्गत महामागार्वर २८ फेब्रुवारी घडलेल्या या घटनेत पोलिसांनी ७ जणांच्या टोळीला जेरबंद केले आहे. लोखंडी सळ्या व गुन्ह्यात वापरलेले चारचाकी वाहनही जप्त केले आहे. ही कारवाई रविवारी करण्यात आली.प्राप्त माहितीनुसार, ट्रक चालक फिर्यादी प्रवीण रामभाऊ धांडे (रा.मानकापूर, नागपूर) हे ट्रक क्रमांक सीजी ०७-सीए ३४०० मध्ये रायपूर येथून १२ लाख ४५ हजार ६३३ रुपये किमतीच्या २५ टन ४० किलो वजनाच्या लोखंडी सळ्या घेऊन २८ फेब्रुवारी रोजी नागपूरला जात होते. मात्र, देवरी येथे महामार्गावर पांढऱ्या रंगाच्या चारचाकी वाहनात आलेल्या ७ जणांनी त्यांना मारहाण करून व हातपाय व डोळ्याला पट्टी बांधून ट्रक पळून नेला होता. त्यानंतर, आरोपींनी ट्रकमधील सळ्या अन्यत्र काढून धांडे यांना ट्रकसह चंद्रपूर जिल्ह्यातील नागभिड-नागपूर मार्गावरील नवखडा गावाजवळ सोडून दिले होते. प्रकरणी नागभिड पोलीस ठाणे व देवरी पोलीस ठाण्यात भादंविच्या कलम ३४१, ३९५ अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला होता. या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेने पथक तयार करून भंडारा, नागपूर व नागभिड येथे जाऊन तपास सुरू केला असता, नागपूर येथील इसम पप्पू हसन (रा.डोंगरगाव,हिंगणा) हा आपल्या साथीदारांसह अशा प्रकारचे गुन्हे करीत असल्याची माहिती त्यांच्या हाती लागली. यावर पथकाने पप्पू हसनला ताब्यात घेतले. विचारपूस केली असता, त्याने आपल्या ७ साथीदारांसह हा गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यानुसार, पोलिसांनी त्याच्या साथीदारांना ताब्यात घेतले व विचारपूस केली असता, त्यांनी कबुली देत, लोखंडी सळ्या कोठे ठेवल्या आहेत, याचीही माहिती दिली. त्यानुसार, पथकाने नागपूर येथे जाऊन ग्राम सोंडपार येथील महामार्गापासून दूर आत कच्च्या रस्त्यावरून लोखंडी सळ्या व गुन्ह्यात वापरलेले चारचाकी वाहन ताब्यात घेतले आहे.
या साथीदारांना केली अटक या प्रकरणात पोलिसांनी शफीर नजीर हसन उर्फ पप्पू हसन (५५) याच्यासोबत हा गुन्हा करणाऱ्या शुभम वासुदेव चक्रवर्ती (३१,रा.नवीन गुमगाव), ऋषभ ज्ञानेश्वर चिरूटकर (१९,रा. नवीन गुमगाव), अरुण देवाजी वरखडे (२२, रा.नवीन गुमगाव), महेंद्र नेवालाल गमधरे (३५, रा.डोंगरगाव), अभिलेख नामदेव गावतुरे (१९,रा. नवीन गुमगाव) व अशोक लक्ष्मण दुधनाग (१९, रा.नवीन गुमगाव) यांना ताब्यात घेऊन अटक केली आहे. न्यायालयाने या आरोपींना सोमवारपर्यंत (दि.८) पोलीस कोठडी सुनावली आहे.