गोंदिया: सद्य:स्थितीत सोशल मीडियावर विधवांना लाभ देण्याच्या चुकीच्या पोस्ट करीत असल्यामुळे लोक संभ्रमात आहेत. ज्या घरातील २१ ते ७० या वयोगटातील कर्त्या व्यक्तीचे निधन झाले आहे, अशा विधवा झालेल्या महिलांना महिला व बाल विकास विभागाच्या जिजामाता, जिजाऊ या योजनेंतर्गत ५० हजार प्रति लाभार्थी मिळतील, अशी पोष्ट सोशल मीडियाद्वारे व्हाॅट्सॲपवर व्हायरल होत आहे. त्यामुळे महिलांची फसवणूक होऊ शकते म्हणून महिला व बाल कल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय गणवीर यांनी पत्र काढून यांनी अशी कोणतीच योजना नसल्याचे स्पष्ट केले आहे.
१ मार्च २०२० ते २८ फेब्रुवारी २०२१ या कालावधीत ज्या घरातील २१ ते ७० या वयोगटातील कर्त्या व्यक्तीचे निधन झाले आहे अशा विधवा झालेल्या महिलांना महिला व बाल विकास विभागाच्या जिजामाता, जिजाऊ या योजनेंतर्गत ५० हजार रुपये प्रति लाभार्थी मिळतील अशी पोष्ट सोशल मीडियाद्वारे व्हाॅट्सॲपवर व्हायरल होत असल्याचे निदर्शनास आले आहे. ही पोष्ट खोटी व बनावट असल्याचे त्यांनी काढलेल्या पत्रात म्हटले आहे. प्रकारची कोणतीही योजना महिला व बाल कल्याण विभागामार्फत राबविण्यात येत नाही. या मेसेजमुळे नागरिकांची फसवणूक होण्याची शक्यता लक्षात घेता,अशी कोणतीही योजना महिला व बाल विकास विभागामार्फत राबविली जात नसून या मेसेजला नागरिकांनी बळी पडू नये असे महिला व बाल कल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय गणवीर यांनी कळविले आहे.