नरेश रहिले
गोंदिया : देशपातळीवर सर्व नक्षल प्रभावित जिल्ह्यांमध्ये लाखो डीटीएच कनेक्शन मोफत दिले जाणार आहेत. दरम्यान, गोंदिया जिल्ह्यातील १५९ गावांतील १ हजार १५६ कुटुंबांची यादी जिल्हा आणि पोलिस प्रशासनाकडून तयार करण्यात आली आहे. ती माहिती शासनाला पाठविण्यात आली आहे. यासाठी नोडल अधिकारी म्हणून अपर पोलिस अधीक्षक अशोक बनकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी केलेल्या सर्वेक्षणानंतर निश्चित झालेल्या कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
भारताच्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने राज्यातल्या नक्षल प्रभावित गोंदिया जिल्ह्यामध्ये केंद्रीय गृह विभाग आणि माहिती प्रसारण विभागाकडून अभिनव योजना सुरू करण्यात आली आहे. गोंदिया जिल्ह्यामधील नक्षल प्रभावित क्षेत्रातील १५९ गावांत केंद्रीय गृह विभाग आणि केंद्रीय माहिती प्रसारण विभागाच्या वतीने तब्बल ११५६ कुटुंबांना डीटीएच कनेक्शन मोफत दिले जाणार आहे. त्याअंतर्गत या कुटुंबांच्या घरात सेटटॉप बॉक्स आणि डीटीएचसाठीची डिश दिली जाणार आहे.
नक्षल प्रभावित भागातील जनतेला इन्फॉर्मेशन कनेक्टिव्हिटी मिळावी आणि नक्षलवाद्यांच्या खोट्या प्रचारापासून त्यांची सुटका व्हावी, या उद्देशाने ही अभिनव योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत पुढील काही महिन्यांमध्ये देशपातळीवर सर्व नक्षल प्रभावित जिल्ह्यांमध्ये लाखो डीटीएच कनेक्शन मोफत दिले जाणार आहेत. दरम्यान, गोंदिया जिल्ह्यातील १५९ गावांतील कुटुंबांची यादी जिल्हा आणि पोलिस प्रशासनाकडून तयार करण्यात आली आहे.
काय आहे इन्फॉर्मेशन कनेक्टिव्हिटीची योजना?
देशातील सीमावर्ती जिल्हे तसेच अंतर्गत सुरक्षेच्या दृष्टीने संवेदनशील जिल्ह्यात इन्फॉर्मेशन कनेक्टिव्हिटी उपलब्ध करून देणे, त्यासाठी सीमेवरील जिल्ह्यात घरात टीव्ही नसलेल्या गरीब कुटुंबांना डीटीएच कनेक्शन मोफत दिले जाणार आहे. गडचिरोली आणि गोंदिया या नक्षल प्रभावित जिल्ह्यात ७१ हजार डीटीएच कनेक्शन दिले जाणार आहे. देशाच्या इतर भागांच्या तुलनेत सीमावर्ती जिल्ह्यात किंवा संवेदनशील भागात अनेक प्रकारचा मागासलेपण असल्याने जनतेच्या मनात सरकारबद्दल अविश्वासाची भावना असते. मोफत डीटीएच कनेक्शन देण्याच्या योजनेद्वारे केंद्र सरकार टीव्हीच्या माध्यमातून लोकांच्या घरी पोहोचून तोच अविश्वास दूर करण्याच्या प्रयत्नात आहे.
योजनेचे काय उद्दिष्ट?
या योजनेद्वारे देश विरोधी शक्तींचा अपप्रचार थांबवणे, हेही प्रमुख उद्दिष्ट आहे. सीमावर्ती भागात चीन आणि पाकिस्तान सारख्या शत्रू राष्ट्र अनेक प्रकारचा अपप्रचार करीत असतात. तर नक्षल प्रभावित भागात नक्षलवादी बॅनर, पोस्टर तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून देश विरोधात अपप्रचार करत असतात. याला प्रतिबंध लावण्यासाठी ही नवीन योजना आहे. लवकरच या कुटुंबांच्या घरी मोफत डीटीएच लागलेले पाहायला मिळतील.