नवेगावबांध : अर्जुनी-मोरगाव उपविभागाअंतर्गत येणाऱ्या अर्जुनी-मोरगाव व सडक-अर्जुनी या दोन्ही तालुक्यांतील नागरिकांनी १०० टक्के लसीकरण करून गाव कोरोनामुक्त करावे, असे आवाहन उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले यांनी केले. झूम मीटिंगच्या माध्यमातून त्यांनी ७० ग्रामपंचायतींसोबत संवाद साधला.
मंगळवारी (दि.१८) येथील ग्रामीण रुग्णालय, लसीकरण केंद्र व आरोग्यवर्धिनी उपकेंद्राला प्रत्यक्ष भेट देऊन त्यांनी याबाबतचा आढावा घेतला. लसीकरणामुळे मानवी आरोग्यावर कुठल्याही प्रकारचे अनिष्ट परिणाम होत नाहीत. लसीकरण व कोरोना चाचण्या मोहिमेला नागरिकांनी सहकार्य करून स्वत:च्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले. नवेगावबांधसह अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील कन्हाळगाव, भरनोली, इळदा या आदिवासी दुर्गम भागात १९ मे रोजी तालुक्यातील अधिकाऱ्यांसह त्यांनी भेट दिली. लसीकरण, कोरोना तपासणी व नागरिकांचे सहकार्य त्यांच्यात करण्यात येणारी जनजागृती याबाबतचा आढावा स्थानिक ग्रामपंचायतमध्ये बैठक घेऊन अधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्याकडून घेतला, तसेच लसीकरण मोहिमेचा वेग वाढवावा, लोकांमध्ये जागृती घडवावी, लोकांना लसीकरणासाठी प्रवृत्त करावे, गावात १०० टक्के लसीकरण व्हावे, असे निर्देश त्यांनी यावेळी स्थानिक अधिकारी, लोकप्रतिनिधी, कर्मचारी व ग्राम कोविड पथक यांना दिले. कन्हाळगाव येथील महिला-पुरुषांची भेट घेऊन लसीकरण झालेल्यांची आस्थेने चौकशी केली. यावेळी अर्जुनी-मोरगावचे तहसीलदार विनोद मेश्राम, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.विजय राऊत, गटविकास अधिकारी यू.टी. राठोड, पोलीस निरीक्षक संदीप इंगळे, वैद्यकीय अधिकारी डॉ.पिंकू मंडल, स्थानिक तलाठी, आरोग्य कर्मचारी, वैद्यकीय अधिकारी व स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
-----------------------------
७० ग्रामपंचयतींसोबत साधला संवाद
गुरुवारी (दि.२०) तहसील कार्यालयातून त्यांनी तालुक्यातील ७० ग्रामपंचायतींना झूम मीटिंगमध्ये सहभागी करून संवाद साधला. १०० टक्के लसीकरण करून आपले गाव कोरोनामुक्त करण्यास मदत करावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, तलाठी, कोरोना गाव समिती, ग्राम कोरोना पथक यांच्याशी संपर्क साधून लसीकरण मोहीम आपल्या गावात शंभर टक्के यशस्वी करावी, तसेच याबाबतची जनजागृती गावागावात करावी, असेही आवाहन यावेळी त्यांनी केले. यावेळी तहसीलदार विनोद मेश्राम, तालुका आरोग्य अधिकारी विजय राऊत, गटविकास अधिकारी यू.टी. राठोड उपस्थित होते.