ग्रे लेग गुजचे प्रमाण अधिक : पक्ष्यांनीही शोधले सुरक्षित ठिकाण अर्जुनी-मोरगाव : तालुक्यातील जलाशये व पाणवठ्यांवर यंदा बऱ्यापैकी विदेशी पाहुण्यांचे आगमन झाले. फेबु्रवारी महिन्याच्या अखेरपर्यंत त्यांचा परतीचा प्रवास सुरू होणार आहे. नेहमीच्या प्रसिद्ध जलाशयासोबतच यावर्षी विदेशी पाहुण्यांनी निर्जन पाठवण्यांना पसंती दिल्याचे जाणवते. आगमन झालेल्या विदेशी पाहुण्यात युरोप खंडातील ग्रे लेग गुज पक्ष्यांची संख्या यावर्षी लक्षणिय आहे. सोनेगावसारख्या तलावावर त्यांची तात्पुरती हजेरी ही पक्षीप्रेमी व अभ्यासकांच्या दृष्टीने आनंदाची पर्वणी ठरती आहे. अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील राष्ट्रीय उद्यानातील नवेगाव जलाशय, इटियाडोह धरण, सिरेगावबांध, बोंडगाव/सुरबन येथील श्रृंगारबांध व भुरसीटोला तलावांवर दरवर्षी मोठ्या प्रमाणावर विदेशी पक्ष्यांची रेलचेल असायची. साधारणत: येथे आॅक्टोबर ते फेबु्रवारी महिन्यादरम्यान पक्षी मुक्कामी असतात. मात्र यावर्षी मोरगाव, माहुरकुडा तसेच बुटाई कॅम्पच्या फुटका तलावावर सुद्धा अल्प प्रमाणात का होईना, विदेशी पक्ष्यांनी हजेरी लावली आहे. नवेगावबांध, भुरसोटीला, श्रृंगारबाद या तलावात मोठ्या प्रमाणावर भेट देणाऱ्या मुख्य विदेशी पक्ष्यांमध्ये प्रामुख्याने ग्रे लेग गुज, लेसर विसलींग डक, चांदीकुट, गार्गनी, कॉमनटिल, पिनटेल, टपटेल पोचार्ड, लिटल ग्रेब, वुडसँड पाईपर, युरेशियन कर्लू, कॉम्बडक यांचा समावेश आहे. श्रृंगारबांध तलावावर यंदा ग्रेहॅरॉनचे दर्शन घडले. उन्हाळ्याची चाहूल लागताच हे विदेशी पक्षी साधारणपणे फेबु्रवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून स्वदेश परतीच्या मार्गाला लागतात. (तालुका प्रतिनिधी) मानवी उपद्रवापासून बचावाचा प्रयत्न सोनेगाव तलावावर यावर्षी प्रथमच ग्रे लेग गुज बघावयास मिळाला. यासोबतच ब्लेड विंग्ड स्टिक्ट, लिटल रिंग्ड प्लवर, ब्लेक आयबीस, इंडियन रोलर, कॉमन सेंड पायपर हे पक्षी मुक्तसंचार करताना आढळले. पक्षीप्रेमी व अभ्यासकांच्या दृष्टीने सोनेगाव तलाव दुर्लक्षित आहे. या तलावावर पक्षीगणना झाल्याचे ऐकिवात नाही. मात्र अशा निर्जन तलावांवरील यावर्षीची विदेशी पक्ष्यांची हजेरी ही मानवी उपद्रवापासूनचा बचावाचा संकेत दर्शविले. यावर्षी विदेशी पक्ष्यांची तलावांवरील संख्या लक्षणिय आहे. त्यात मानवी हस्तक्षेप नसलेल्या तलावात हजेरी ही प्रथमत:च नाविन्यपूर्ण बाब दिसून आली. जलाशय, तलावशेजारील शेतात ट्रॅक्टर व मानवी आवाजामुळे पक्षी त्रस्त होतात. कोळी बांधवाकडून मासेमारी करताना अजाणतेपणाने पक्ष्यांचे अधिवास व घरटी किंबहूना अंडी नष्ट होतात. त्यामुळे पक्षी त्या तलावाकडे पाठ फिरवितात.
निर्जन पाणवठ्यांवर विदेशी पाहुण्यांचा मुक्तसंचार
By admin | Published: February 16, 2017 12:40 AM