‘बँड’ला जास्त मागणी : व्हॅट्सअॅप संदेशांची ग्रिटींग कार्डवर मात कपिल केकत गोंदिया मित्रत्वाचे नाते जपण्यासाठी एक ठराविक दिवस नसला तरी आॅगस्ट महिन्यातील पहिल्या रविवारी ‘फे्रेडशीप डे’ अर्थात ‘मैत्री दिवस’ साजरा करण्याची परंपरा रूढ आहे. या ‘फे्रेडशीप डे’ची शहरातील शाळा व महाविद्यालयीन तरूण-तरूणींत क्रेज आहे. ‘फे्रेडशीप डे’ला आपल्या मित्र-मैत्रिणींना शुभेच्छा देण्यासाठी युवा पिढी बँड खरेदी सुरू आहे. मात्र खऱ्या अर्थाने मैत्रिभाव जपण्याऐवजी त्यात दिखाऊपणालाच प्राधान्य दिल्या जात असल्याचे दिसून येत आहे. रक्ताचे नाते सोडल्यानंतर ‘मैत्री’ हेच जगातील सर्वात घट्ट असे नाते मानले जाते. कधी-कधी तर रक्ताचे नाते कामी पडत नाही, मात्र मैत्रीचे नातेच धाऊन येतात. आजच्या काळातील स्थिती याच प्रकारात मोडते असे म्हणणे वावगे ठरणार नाही. मित्रत्वाच्या नात्यांसाठी ठरावीक वेळ व कालावधी नाही. मात्र यासाठीही आजच्या काळात दिवस ठरवून देण्यात आलेला आहे. ‘फ्रेंडशीप डे’ म्हणून हा दिवस ७ आॅगस्ट रोजी साजरा केला जात आहे. विशेष म्हणजे मैत्री ही एका ठरावीक वयोगटासाठीच मर्यादीत नाही. मात्र ‘फ्रेंडशीप डे’चा क्रेज आज शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांत जास्त दिसून येतो. या युवा पिढीने उत्साहाच्याभरात या दिनाचे वैशिष्ट मर्यादीत करून टाकल्याचे दिसते. हेच कारण आहे की, रविवारी येत असलेल्या ‘फ्रेंडशीप डे’च्या तयारीत युवा व्यस्त दिसून येत आहेत. आपल्या मित्रांना या दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी सध्या ‘फ्रेंडशीप डे’साठी बाजारात उपलब्ध असलेले ‘बँड’ खरेदी करताना हे युवा दिसून येत आहेत. गिफ्ट व ग्रीटींग कार्ड हे महागडे पडत असल्याने एवढ्या मित्रांना त्यांचे वाटप करणे परवडणारे नाही. परिणामी बँडचा खप अधिक असल्याचे विक्रेता सांगतात. बाजारात खास ‘फ्रेंडशीप डे’ चे विविध प्रकारचे बँड दिसून येत आहेत. हे बँड दोन रूपयांपासून ३०० रूपयांपर्यंत आहेत. यामुळे आपल्या मित्रांना देण्यासाठी परवडणारे असल्याने सर्वाधीक खप यांचाच होत आहे. आपल्या मित्राच्या हातावर फ्रेंडशीप बँड बांधण्याची एक परंपराच जणू यामुळे प्रचलीत झाली आहे. हे फॅड आता शाळा व महाविद्यालयातील मुला-मुलीं पुरतेच राहिले नसून कॉन्व्हेंटमधील चिमुकलेही ते खरेदी करत असल्याचे दिसते. बँड, ग्रिटींग व मगची धूम ‘फ्रेंडशिप डे’ निमित्त बाजारात खास गीफ्टही आता उपलब्ध झाले आहेत. यात फ्रेंडशीप बँड, ग्रीटींग कार्ड्स व खास मग बाजारात उपलब्ध आहेत. आपल्या मित्रांना या दिनाच्या शुभेच्छा देत त्यांच्या हातावर बँड बांधण्याची एक परंपराच सुरू झाली आहे. याशिवाय ग्रीटींग कार्ड किंवा त्यासोबत खास मित्रांना देण्यासाठी मग सुद्धा आहेत. येथील एका दुकानात बघितले असता त्यांच्याकडे ५० रूपयांपासून ते ५५० रूपयांपर्यंतचे खास मग उपलब्ध आहेत. ग्रीटींगमध्ये ४० रूपयांपासून ते २०० रूपयांपर्यंतचे ग्रीटींग आहेत. शिवाय विविध प्रकारचे बँडही दिसून आले. ग्रिटींगजला व्हॉटसअॅपचे ग्रहण ग्रिटींग हा प्रकार पुर्वी जोमात चालत होता. प्रत्येक सण किंवा विशीष्ट दिवसांसाठी ग्रीटींग कार्ड उपलब्ध आहेत. एखाद्याला शुभेच्छा देण्यासाठी हमखास ग्रीटींग खरेदी केले जात होते. मात्र मोबाईल आल्यापासून शुभेच्छा देण्यासाठी ग्रीटींगची पद्धत आता बंद पडली आहे. आज प्रत्येकाच्या हाती मोबाईल असून त्यात व्हॉट्सअॅपने चांगलाच गोंधळ घातला आहे. सगळेच शुभेच्छा व्हॉट्सअॅपवरूनच समोरच्या व्यक्तीला पाठवून सगळे मोकळे होत आहेत. यातून ग्रीटींगसाठी येणारा खर्च वाचत असल्याने ग्रीटींग देण्याची पद्धतच संपुष्टात आली आहे. बँड खरेदीत मुलीच आघाडीवर फ्रेंडशिप बँड खरेदीसाठी मुलीच आघाडीवर असल्याचे विक्रेते सांगत आहेत. मुले-मुली दोघांसाठी हा दिवस असताना फक्त मुलीच सर्वाधीक बँड खरेदी करीत असल्याचे दिसून येत आहे. यातून मुलीच आपल्या मित्रांप्रती जास्त भाऊक किंवा नाते जोपासण्यात अग्रेसर असल्याचे म्हणता येईल. मात्र ‘फ्रेंडशीप डे’चा हा क्रेज आता ओसरत चालल्याचेही विक्रेते सांगतात. मोबाईलचा वापर वाढल्याने आता आॅनलाईन शुभेच्छा देण्यावरच सर्वांचा भर दिसून येत असल्याचे विक्रेत्यांनी बोलून दाखविले.
मोबाईलमुळे ‘फ्रेंडशिप डे’ची क्रेज ओसरली
By admin | Published: August 07, 2016 12:51 AM