लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : बिरसी विमानतळावरुन प्रवासी विमान वाहतूक सेवेचे टेकऑफ होण्याची मागील अनेक दिवसांपासूनची प्रतीक्षा आता संपली आहे. येत्या १३ मार्चपासून या विमानतळावरून इंदूर-गोंदिया-हैदराबाद विमान सेवेला प्रारंभ होणार आहे. त्यासंबंधिची आवश्यक सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्याची माहिती खा. सुनील मेंढे यांनी शनिवारी (दि.२६) बिरसी विमानतळ येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. बिरसी विमानतळावरुन प्रवासी विमान वाहतूक सेवा सुरू व्हावी यासाठी मागील दोन वर्षांपासून प्रयत्न केले जात आहे. शासनाच्या उड्डाण योजनेतंर्गत प्रवासी विमान वाहतूक सेवेला आता प्रारंभ करण्यात येणार आहे. विमानसेवा सुरु करण्यासाठी केंद्रीय उड्डयन मंत्रालय आणि इतर विभागाकडून आवश्यक असलेल्या परवानग्या मिळाल्या आहेत. आता विमान सेवा सुरु करण्यास कुठलीच अडचण नसल्याचे खा. मेंढे यांनी सांगितले. नोयडा येथील फ्लाय बिग कंपनीने याचे कंत्राट घेतले आहे. १३ मार्चपासून इंदूर-गोंदिया-हैदराबाद या विमान सेवेला प्रारंभ होणार आहे. या विमान सेवेचा प्रारंभ केंद्रीय विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया इंदूर येथून करणार आहे तर बिरसी विमानतळावर सुध्दा यावेळी विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत. गोंदिया-इंदूर प्रवासाकरिता १ तास १५ मिनिट तर गोंदिया ते हैदराबादसाठी १ तास ३० मिनिटे लागणार आहे. सुरुवातीला ७० सीटर एकच विमान असणार असून त्यानंतर संख्या वाढविण्यात येणार आहे. तर हैदराबादवरुन चेन्नईसाठी कनेक्टींग विमान पकडण्यासाठी या कंपनीच्या माध्यमातून प्रयत्न केला जाणार आहे. त्यामुळे प्रवाशांना ते अधिक सोयीचे होणार आहे. तर लगतच्या मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधील प्रवाशांना सुध्दा याची मदत होणार असल्याचे खा.सुनील मेंढे यांनी सांगितले.
गोंदिया-मुंबई सेवा लवकरच- मुंबई येथील नवीन विमानतळाचे काम पूर्ण होत असून, त्यातील अडचणी सुद्धा दूर झाल्या आहेत. त्यामुळे येत्या सात-आठ महिन्यांत गोंदिया-मुंबई आणि गोंदिया-पुणे ही विमान सेवादेखील सुरू करण्यात येणार असल्याचे संजय मांडवीय यांनी सांगितले.
दोन हजार रुपये असणार प्रवास भाडे - गोंदिया-इंदौर आणि गोंदिया-हैदराबाद या प्रवासासाठी १९९६ रुपये तिकीट दर असणार आहे. तसेच या ठिकाणी नियमित विमानसेवा असणार आहे. या दोन्ही मार्गावर ७० सीटर विमान असणार आहे, तर प्रवाशांची संख्या वाढल्यास विमानांची संख्या सुध्दा वाढविण्यात येणार आहे, तर बिरसी विमानतळावर नाइट लाॅडिंगची परवानगी मिळाल्यानंतर रात्री सुद्धा विमान सेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. तसेच १ मार्चपासून बिरसी विमानतळावरून प्रवाशांना तिकीट बुकिंग करता येणार असल्याचे फ्लाय बिग विमान कंपनीचे संजय मांडवीय यांनी सांगितले.