लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात रोजगाराची समस्या तीव्र असून, सुशिक्षित बेरोजगारांना रोजगारासाठी भटकंती करावी लागत आहे. शासन आणि प्रशासनाच्या दुर्लक्षित धोरणामुळे अंशकालीन, प्रकल्पग्रस्त, दिव्यांग यासारख्या सुशिक्षित बेरोजगारांना देखील नोकरीपासून वंचित राहावे लागत आहे. याकडे शासन आणि प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी बेरोजगार युवकांनी गुरूवारी (ता.४) जिल्हाधिकारी कार्यालयावर मोटारसायकल मोर्चा काढला.जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आले. तसेच विविध मागण्यांचे निवेदन पंतप्रधान, उद्योगमंत्री, केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री, मुख्यमंत्री, पालकमंत्री व राज्याचे उद्योगमंत्री यांच्या नावे निवासी उपजिल्हाधिकारी प्रविण महिरे यांना देण्यात आले. गुरूवारी दुपारी १२ वाजता जयस्तंभ चौक येथून मोटारसायकल मोर्चा काढण्यात आला. शहरातील मुख्य मार्गावरुन हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यात शेकडो युवक सहभागी झाले होते. गोंदिया जिल्हा रोजगाराच्या दृष्टिकोनातून मागासलेला आहे. जिल्ह्यात सुशिक्षितांची फौज तयार होत आहे. जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार युवकांना नोकरीत सामावून घेण्यात यावे.बिरसी विमानतळ व अदानी प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांना शासकीय नोकरी देण्यात यावी, रेल्वे स्थानकातील ४०० व्हेंडरचे व्यवसाय पूर्ववत सुरू करण्यात यावे, नगरपरिषद गोंदिया व रोहयोअंतर्गत दुकान गाळे तयार करून सुशिक्षित बेरोजगारांना वाटप करण्यात यावे, जिल्हा सामान्य रुग्णालयाची रखडलेली पदभरती प्रकिया पूर्ण करण्यात यावी.या मागण्यांचा समावेश असलेले निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी जिल्हाधिकारी महिरे यांना देण्यात आले. शिष्टमंडळात जिल्हाध्यक्ष प्रशांत मेश्राम, उपाध्यक्ष प्रतिक मेश्राम, कमलेश वैद्य, निलेश बावणकर, निशिकांत बन्सोड, शाहरुख पठाण, कैलाश बन्सोड, सुधीर ढोमणे यांचा समावेश होता.
बेरोजगारांचा जिल्हाधिकारीे कार्यालयावर मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2018 10:26 PM
जिल्ह्यात रोजगाराची समस्या तीव्र असून, सुशिक्षित बेरोजगारांना रोजगारासाठी भटकंती करावी लागत आहे. शासन आणि प्रशासनाच्या दुर्लक्षित धोरणामुळे अंशकालीन, प्रकल्पग्रस्त, दिव्यांग यासारख्या सुशिक्षित बेरोजगारांना देखील नोकरीपासून वंचित राहावे लागत आहे.
ठळक मुद्देविविध मागण्या : जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन