गोंदिया : सालेकसा तालुक्यातील ग्राम साखरीटोला येथील विदर्भ ग्रामीण पतसंस्थेत एक कोटी १० लाख ८७ हजार १९४ रूपयांची अफरातफर करणाऱ्या दोघांना सालेकसा पोलिसांनी मंगळवारी (दि.२०) अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये संस्थेचा अध्यक्ष तथा अभिकर्ता योगेशसिंह शेरसिंग बैस व संचालक (रेकार्ड लिखाण करणारा) प्रल्हाद भाऊदास राऊत यांचा समावेश असून ते २ वर्षांपासून फरार होते.
या संदर्भात लेखापरिक्षक राजेश पांडुरंग बावनथडे (रा. महाराजीटोला, आमगाव) यांनी विदर्भ ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेत तयार करण्यात आलेल्या ऑडीट अहवालावरुन संस्थेचे अध्यक्ष तथा अभिकर्ता योगेशसिंह बैस, संचालक (रेकार्ड लिखान करणारा) प्रल्हाद भाऊदास राऊत व संस्था कर्मचारी अल्का योगेशसिंह बैस यांनी त्या संस्थेच्या ठेविदारांनी ठेवीच्या स्वरुपात जमा केलेल्या पैशांच्या कॅशबुकमधील रोख शिल्लक घटवून, संस्थेच्या बँक खात्यातून एक कोटी १० लाख ८७ हजार १९४ रूपयाची अफरातफर केल्याची तक्रार दिली होती. यावर सालेकसा पोलिसांनी भादंविच्या कलम ४०६, ४०९, ४२०, ३४ सहकलम ३ महाराष्ट्र ठेवीदाराच्या (वित्तीय आस्थापनेमधील) हितसंबंधाचे संरक्षण करण्याबाबतचा अधिनियम १९९९ अन्वये गुन्हा दाखल केला होता.
यानंतर योगेशसिंह बैस व प्रल्हाद राऊत हे दोघे आरोपी मागील २ वर्षांपासून फरार होते. दरम्यान मंगळवारी (दि.२०) त्या दोघांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, अपर पोलीस अधिक्षक अशोक बनकर, उपविभागिय पोलीस अधिकारी जालींदर नालकुल यांच्या मार्गदर्शनात सालेकसाचे ठाणेदार प्रमोद बघेले, सहायक पोलीस निरीक्षक सुनील जानकर, पोलीस उपनिरीक्षक भिष्मराज सोरते, सहायक फाैजदार बडवाईक, पोलीस नायक बिजेंद्र बिसेन, प्रमोद सोनवाने, खोब्रागडे, यादव, बन्सोड यांनी केली आहे.