लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : तालुक्यातील बिरसी विमानतळावरून प्रवासी वाहतूक सेवेचे उड्डाण होण्याची प्रतीक्षा मागील पंधरा वर्षांपासून जिल्हावासीयांना होती. त्याचीच पूर्तत: आता झाली असून रविवारपासून (दि.१३) प्रवासी विमान वाहतुकीचे टेकऑफ होणार आहे. केंद्रीय नागरी उड्डाणमंत्री ज्योतिरादित्य सिंधिया हे सकाळी ९ वाजता इंदूर येथून हिरवी झेंडी दाखवून विमानसेवेचा प्रारंभ करणार आहेत. गोंदिया-इंदूर-हैदराबाद या सेवेला रविवारपासून नियमित प्रारंभ होत असल्याने जिल्हावासीयांच्या स्वप्नांची पूर्तता झाली आहे. तत्कालीन केंद्रीय विमान वाहतूकमंत्री प्रफुल्ल पटेल यांनी गोंदिया जिल्ह्याच्या भविष्याचा विचार करून तालुक्यातील बिरसी येथील इंग्रजकालीन विमानतळाला नवीन स्वरूप देत त्याचे अत्याधुनिकीकरण केले. आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ तयार करून त्या ठिकाणी नाइट लँडिंगची व्यवस्था केली. याच धावपट्टीवरून रविवारपासून प्रवासी विमान वाहतूक सेवा सुरू होत असून जिल्हावासीयांसाठी निश्चितच गौरवाची बाब आहे. बिरसी येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ झाल्याने प्रवासी विमान वाहतूक सेवेला प्रारंभ करणे शक्य झाले आहे. त्यावेळी या प्रकल्पाला काहींनी विरोधसुद्धा केला होता; पण खा. पटेल यांनी याला न जुमानता आपल्या निर्णयावर ठाम राहत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विमानतळाची उभारणी केली. अन्यथा या विमानतळावरून प्रवासी विमान वाहतूक सेवेचा प्रारंभ करण्याचे स्वप्न पूर्ण झाले नसते ही बाबदेखील तेवढीच सत्य आहे. या विमानसेवेचा लाभ महाराष्ट्रासह लगतच्या मध्य प्रदेश, छत्तीसगड या राज्यातील प्रवाशांना सुद्धा होणार आहे. शेतीविषयक मालाची वाहतूक करण्यास या सेवेची भविष्यात मदत होणार आहे. ७९ वर्षांनतर झाली स्वप्नपूर्ती गोंदिया तालुक्यातील बिरसी येथील विमानतळाची उभारणी ब्रिटिश सरकारने दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान १९४२-४३ मध्ये केली होती. त्यानंतर २००५ मध्ये तत्कालीन केंद्रीय नागरी उड्डयनमंत्री प्रफुल्ल पटेल यांनी या विमानतळाचे आधुनिकीकरण करीत आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ सुरू केले. त्यानंतर आता तब्बल ७९ वर्षांच्या कालावधीनंतर केंद्र शासनाच्या उड्डाण योजनेंतर्गत प्रवासी विमान वाहतूक सेवेस प्रारंभ होत आहे. असे राहणार वेळापत्रकइंदूर विमानतळावरून सकाळी ९.३० सुटेल आणि गोंदिया विमानतळावर सकाळी १०.४५ वाजता पोहोचेल. तर हैदराबादसाठी १ वाजता उड्डाण भरले. त्यानंतर सोमवारपासून नियमित वेळापत्रकानुसार इंदूर-गोंदिया-हैदराबाद अशी विमान सेवा सुरू राहणार असल्याचे फ्लॉय बिग कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
बिरसी येथे भविष्याचा विचार करून आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ तयार केले होते. या विमानतळावर नाइट लँडिंगसह सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आले. तसेच येथे पायलट प्रशिक्षण केंद्रदेखील सुरू आहे. याच विमानतळावरून आता प्रवासी विमान वाहतूक सेवा सुरू होत असल्याचा निश्चित आनंद आहे.- प्रफुल्ल पटेल, खासदारबिरसी विमानतळावरून प्रवासी विमान वाहतूक सेवेला प्रारंभ व्हावा यासाठी मागील दोन वर्षांपासून केंद्रीय नागरी उड्डयन मंत्रालयाकडे पाठपुरावा सुरू ठेवला होता. त्याचेच आता फलित झाले आहे.- सुनील मेंढे, खासदारबिरसी विमानतळावरून प्रवासी विमान वाहतूक सेवेला प्रारंभ होत असल्याची बाब निश्चितच जिल्हावासीयांसाठी आनंदाची आहे. यामुळे जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळण्यास मदत होईल.- विनोद अग्रवाल, आमदार