लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपंचायतीची निवडणुकीसाठी २१ डिसेंबरला मतदान होणार आहे. मतदानाच्या ४८ तासांपूर्वी जाहीर प्रचार बंद करावा लागत असल्याने रविवारी (दि.१९) सायंकाळी ५ वाजता जाहीर प्रचाराला फुलस्टॉप लागला. आता सर्वच उमेदवारांचा मतदारांच्या प्रत्यक्ष गाठीभेटी घेण्यावर भर असणार आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपंचायतीची निवडणुकीसाठी रविवारी जाहीर प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभा, रॅली, पदयात्रा, मोटारसायकल रॅली आणि रोड शो चे नियोजन केले होते. त्यामुळे निवडणूक होऊ घातलेल्या क्षेत्रात रविवारी प्रचारासाठी चांगलीच धामधूम पाहायला मिळाली. जिल्हा परिषदेच्या ४३, पंचायत समितीच्या ८६ जागांसाठी एकूण ६९१ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. तर अर्जुनी मोरगाव, सडक अर्जुनी, देवरी नगरपंचायतीच्या एकूण ४५ जागांसाठी १९७ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. स्थानिक स्तरावर या निवडणुकींना फार महत्त्व असल्याने आणि स्थानिक पातळीवर आपली पकड मजबूत करण्यासाठी सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची करीत जोर लावला होता. रविवारी सर्वच प्रमुख पक्ष व अपक्ष उमेदवारांनी आपापल्या निवडणूक क्षेत्रात रॅली काढून जोरदार शक्तिप्रदर्शन करून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. मंगळवारी (दि.२१) मतदान होणार असल्याने आता सर्वच उमेदवारांचा शेवटच्या टप्प्यात मतदारांच्या प्रत्यक्ष गाठीभेट घेण्यावर भर असणार आहे.
शेवटच्या दोन दिवसांत दिग्गजांच्या सभा - जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपंचायतीची निवडणुकीच्या प्रचारासाठी उमेदवारांना फारच कमी कालावधी मिळाला. चार दिवसांच्या कालावधीत अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्याचा उमेदवार, राजकीय पक्ष, नेते आणि कार्यकर्त्यांनी प्रयत्न केला. शनिवारी आणि रविवारी जिल्ह्यात सर्वच पक्षांच्या दिग्गज नेत्यांनी जम्बो प्रचारसभा घेतल्या. त्यामुळे एकाच दिवशी १५ ते २० सभा घेताना नेत्याची सुद्धा तारांबळ उडाली होती.
महिनाभर होणार उमेदवारांची घालमेल - ओबीसी जागा खुल्या करून त्या जागांवर १८ जानेवारीला निवडणूक होणार आहे. तर त्यापूर्वी इतर जागांसाठी २१ डिसेंबरला निवडणूक होत आहे. या दोन्ही निवडणुकांची मतमोजणी एकत्र म्हणजे १९ जानेवारीला होणार आहे. त्यामुळे निकालासाठी उमेदवारांना महिनाभराची प्रतीक्षा करावी लागणार आहे. त्यामुळे निकाल काय लागतोय या चिंतेने उमेदवारांची चांगलीच घालमेल होणार आहे.
उमेदवारांसाठी आज कत्तल की रात- जिल्हा परिषद, पंचायत आणि पंचायत समितीसाठी उद्या, मंगळवारी मतदान होणार आहे. मतदानापूर्वी मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी आज, सोमवारचा दिवस महत्त्वपूर्ण ठरणार आहे. सोमवारची रात्र उमेदवारांसाठी कत्तल की रात असणार असून, सर्वच उमेदवारांना आपला जोर लावण्यासाठी हा शेवटचा दिवस असणार आहे.
आता डोअर टू डोअर प्रचार - जरविवारी सायंकाळी ५ वाजेपासून जाहीर प्रचार बंद झाला. त्यामुळे उर्वरित दोन दिवसांत सर्वच उमेदवारांचा डोअर टू डोअर प्रचारावर भर असणार आहे. त्यामुळे मतदारांवर आपली छाप पाडण्यात हे उमेदवार कितपत यशस्वी होतात, हे १९ जानेवारीला मतमोजणीनंतरच स्पष्ट होणार आहे.