गोंदिया : जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील महत्वपूर्ण प्रकल्प समजल्या जाणाऱ्या धापेवाडा टप्पा दोन प्रकल्पाचे काम पूर्ण करण्यासाठी १०० कोटी रुपयांची गरज आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यास २८ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येण्यास मदत होणार असून, जवळपास २८ गावांतील शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे. टप्पा एकचे काम पूर्ण झाले असून, टप्पा दोनच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे.
सालेकसा तालुक्यातील बेवारटोला या सिंचन प्रकल्पाचे काम मागील २५ वर्षांपासून रखडले आहे. ८ कोटी रुपयांच्या प्रकल्पाची किमत आता २७ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. या प्रकल्पाच्या लघु कालव्याचे जवळपास ७० टक्के काम होणे शिल्लक आहे. अर्जुनी मारेगाव तालुक्यातील झाशीनगर उपसा सिंचन प्रकल्पाचे ७० टक्के काम पूर्ण झाले. मात्र, उर्वरित ३० टक्के काम रखडले असल्याने ३०४५ हेक्टर क्षेत्र सिंचनापासून वंचित आहे. कटंगी मध्यम प्रकल्प, निमगाव लघु प्रकल्पाचे कामसुध्दा मागील २५ वर्षांपासून जमीन अधिग्रहण आणि झुडपी जंगलामुळे रखडले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सिंचनाच्या सोयीपासून वंचित राहावे लागत आहे, तर सिंचन विभागात एकूण ८२६ पदे मंजूर आहेत. यापैकी केवळ १६८ पदे भरली असून, जवळपास ८० टक्के पदे रिक्त आहेत. याचा सिंचन निर्मितीवर परिणाम होत आहे. जिल्ह्यात एकूण २ लाख २३ हजार १९८ हेक्टर लागवड क्षेत्र असून, सद्यस्थितीत केवळ १ लाख १६ हजार हेक्टर सिंचन निर्मिती होत आहे.