बिरसी फाटा : तिरोडा नगर परिषदेला वैशिष्ट्यपूर्ण कामांसाठी शासनाकडून सन २०१९-२० मध्ये विशेष अनुदान म्हणून चार कोटींचा निधी देण्यात आला होता. यासाठी नगर परिषदेला प्रशासकीय प्रस्ताव पाठविण्याबाबत २६ जुलै २०१९ रोजी पत्र देण्यात आले होते. मात्र विहित मुदतीत नगर परिषदेने प्रस्ताव न पाठविल्यामुळे मिळालेला निधी रद्द करण्यात आला आहे.
शासनाकडून नगर परिषदेला विकास कामासाठी विविध योजनांच्या माध्यमातून निधी दिला जातो. त्यानुसार वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून चार कोटींचा निधी तिरोडा नगर परिषदेला देण्यात आला होता. मात्र यासाठी नगर परिषदेला प्रशासकीय प्रस्ताव पाठविण्यात यावा, यासाठी २६ जुलै २०१९ मध्ये पत्र देण्यात आले होते. असे असतानाही नगर परिषदेने विहित मुदतीत प्रस्ताव पाठविला नाही. त्यामुळे मिळालेला चार कोटींचा निधी शासन मान्यतेने रद्द करण्यात आला आहे. नगर परिषदेने विहित कालावधीत प्रस्ताव सादर न केल्यामुळे वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान मिळणार नाही, असे पत्र १६ फेब्रुवारी रोजी अवर सचिव विवेक कुमार यांनी काढले असल्याची माहिती आहे. यामुळे चार कोटींच्या विकास कामांपासून तिरोडा शहरातील जनतेला मुकावे लागणार आहे.