अंकुश गुंडावारलोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शासनाने गाव तिथे स्मशानभूमी ही संकल्पना राबविली. मात्र यानंतर अजूनही जिल्ह्यातील ७६ गावात स्मशानभूमी नसल्याने मृतकाच्या कुटुंबीय आणि नातेवाईकांना गावाबाहेरील मोकळी जागा अथवा नदी किंवा नाल्याकाठी मृतदेहावर अंत्यसंस्कार करावे लागते. सर्वाधिक अडचण ही पावसाळ्याच्या दिवसात होते. मृतकाचा अंत्यविधी पार पाडण्यासाठी प्रत्येक गावात स्मशानभूमी असणे गरजेचे आहे. यासाठी शासनाकडून निधी देखील मंजूर केला जातो. मृत्यूनंतर मानवी देहाची विटबंना होवू नये, अखेरचा प्रवास सुखाचा व्हावा हीच अपेक्षा सर्वांची असते. मात्र जिल्ह्यातील ९३१ गावांपैकी अद्यापही ७६ गावात स्मशानभूमी नसल्याने तेथील गावकऱ्यांना अंत्यविधीसाठी नदी किंवा नाल्याच्या काठाचा आधार घ्यावा लागतो. मात्र पावसाळ्यात सर्वाधिक समस्या निर्माण होते. ही बाब गावकऱ्यांनी प्रशासनाच्या लक्षात आणून दिली पण अजुनही याची दखल घेण्यात आली नाही.
मु.पो. खोलगड ता.सालेकसासालेकसा तालुक्यातील खोलगड या गावात अद्यापही स्मशानभूमीचे बांधकाम करण्यात आले नाही. त्यामुळे येथील नागरिकांना गावापासून ३ कि.मी.अंतरावर असलेल्या नाल्यावर जावे लागते. मागील आठ दहा वर्षांपासून या गावातील नागरिक ग्रामपंचायत आणि जिल्हा प्रशासनाकडे स्मशानभूमीसाठी जागेची मागणी करीेत आहेत. पण त्याची अद्यापही दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे गावकऱ्यांची समस्या कायम आहे. पावसाळ्याच्या दिवसात तर मृतदेहावर अंत्यविधी करण्यासाठी मोठ्या समस्येला तोंड द्यावे लागत असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले.
मु.पो. मुंडीकोटा ता. तिरोडातिरोडा तालुक्यातील मुंडीकोटा हे मोठे गाव असून या गावात अद्यापही स्मशानभूमीसाठी जागा नाही.त्यामुळे मुंडीकोटासह दोन गावांना भंभोडी मार्गावरील रस्त्यालगत अथवा गावापासून २ कि.मी.अंतरावर असलेल्या वैनगंगा नदीच्या काठावर मृतदेहावर अंत्यविधी करावा लागतो. मात्र सर्वाधिक अडचण ही पावसाळ्याच्या दिवसात होते. स्मशानभूमीसाठी जागा निश्चित करुन त्या ठिकाणी शेड तयार करुन देण्याची नागरिकांची मागणी आहे. मात्र अजुनही ही मागणी मंजूर करण्यात आली नाही. त्यामुळे गावकऱ्यांची समस्या कायम आहे.