अर्जुनी मोरगाव : संत गाडगेबाबा कीर्तनाच्या माध्यमातून थेट श्रोत्यांशी हृदय संवाद करीत. सिंहाला पाहावे रानात, मोराला पाहावे नृत्यात, तसे गाडगेबाबांना पहावे सदैव कीर्तनात असे म्हटले जाते. गाडगेबाबांनी समाजाला स्वच्छतेचा मंत्र दिला. त्यांनी परिसर स्वच्छ केला. झाडू आणि फुटका कुंभ हे बाबांच्या वैराग्याचे प्रतीक आहे. झाडू हे कर्माचे रूपक आहे तर फुटके कुंभ हे त्यांच्या निर्लेप वृत्तीचे बिंब आहे. त्यांनी माणसांची मने स्वच्छ करून प्रबोधन केले, असे कवितेच्या माध्यमातून सरस्वती कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य तथा संस्थेचे सचिव अनिल मंत्री यांनी सांगितले.
याच बरोबर कोरोनाचा वाढता प्रभाव बघून शाळेचे नियोजन व त्याविषयी घ्यावयाची दक्षता याविषयी मार्गदर्शनही त्यांनी केले. सरस्वती विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना व सांस्कृतिक समितीतर्फे आयोजित वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबा जयंती कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर अतिथी म्हणून शाळेच्या पर्यवेक्षिका छाया घाटे, संजय बंगळे, प्रा. यादव बुरडे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या प्रारंभी अतिथींच्या हस्ते देवी सरस्वती व वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबा यांच्या छायाचित्राचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले. याप्रसंगी सांस्कृतिक प्रमुख कुंडलिक लोथे यांनी संत गाडगेबाबा यांच्या जीवनावर माहिती विशद केली. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन सांस्कृतिक प्रमुख कुंडलिक लोथे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. इंद्रनील काशिवार, प्रा. नंदा लाडसे, प्रा. टी. एस. बिसेन, माधुरी पिलारे, रूपराम धकाते, भाग्यश्री सिडाम, सुजित जक्कूलवार, रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. जे. डी. पठाण व रासेयो स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.
......
‘एक मिनिट स्वच्छतेचा’ उपक्रम
संत गाडगेबाबा यांच्या जयंतीचे औचित्य साधून शाळेत संपूर्ण वर्षभर ‘एक मिनिट स्वच्छतेचा’ या उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. उपक्रमाअंतर्गत शाळेतील प्रत्येक विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रत्येक दिवशी स्वच्छतेसाठी एक मिनिट श्रमदान करायचे आहे. शालेय परिसर वर्ग, शाळा, घर इत्यादी ठिकाणी स्वच्छता ठेवायची आहे. परिसरासोबतच मनामनाची स्वच्छता करून बंधुभाव व सामंजस्य जोपासायचे आहे.