गोंदिया : जागतिक स्तरावर ३५ व्या क्रमांकावर असलेल्या अमेरिकेतील न्यूयॉर्क विद्यापीठात एम.एस.इन मेक्याट्रॉनिकस अँड रोबोटिक्स या शाखेत उच्च शिक्षणासाठी मामा चौक गोंदिया येथील नवोदय यादोराव बोरकर या विद्यार्थ्यास प्रवेश मिळाला आहे. त्यासाठी ३१ ऑगस्ट रोजी तो अमेरिकेत दाखल झाला असून त्याच्या या गगन भरारीबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.
महाराष्ट्र शासनाच्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत दोन वर्षांसाठी अंदाजे ८० लाख रुपये शिष्यवृत्ती मंजूर करण्यात आलेले एकमेव विद्यार्थी आहे. नवोदय बोरकरचे प्रथम शिक्षण सरस्वती शिशु मंदिर गोंदिया, १०वी पर्यंतचे शिक्षण गोंदिया पब्लिक स्कूल गोंदिया(सी.बी.एस.ई.), १२ वी पर्यंत डॉ.बाबासाहेब आंबेडकर कॉलेज, नागपूर आणि सिंहगड इंजिनिअरिंग कॉलेज पुणे येथून बी.ई.(मेकॅनिक्स) प्रावीण्यासह केले आहे. दरम्यान त्याचे तीन शोधनिबंध जागतिक स्तरावरील एसएई इंटरनॅशनलमध्ये प्रकाशित झाले आहेत.
नवोदयचे वडील नूतन विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय गोंदिया येथे प्राचार्य तर आईआयसीडीएस आमगाव येथे पर्यवेक्षिका आहेत. कथा वाचन, कादंबरी वाचन, कविता लेखन आणि स्वयंपाक करणे हे नवोदयचे छंद आहेत. त्याने आपल्या यशाचे श्रेय आजोबा,आई,वडील व बहिणींना दिले आहे.