गोंदिया: रेल्वे यार्डात उभ्या असलेल्या रेल्वे डब्यातून लाखो रुपये किंमतीचे फराळाचे ट्रे चोरणाऱ्या आठ चोरट्यांना रेल्वे सुरक्षा बल गोंदियाच्या पथकाने अटक केली. ही कारवाई २४ डिसेंबर रोजी करण्यात आली आहे. चोरी करणाऱ्या या टोळीत तीन विधी संघर्षीत बालके तर पाच वयस्कांचा समावेश आहे. रात्रीच्या वेळी अंधाराचा फायदा घेत गोंदिया रेल्वे यार्डात उभ्या असलेल्या जनशताब्दी एक्स्प्रेसच्या ६ एसी कोच (चेअर कार) मधून सीटच्या मागे लावलेल्या लोखंडी ३०० हून अधिक फराळाचे ट्रे तोडून चोरून नेले. ते ट्रे भंगार खरेदीदारांना विकले. ही माहिती मिळताच आरपीएफ गोंदिया येथे अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला.
या प्रकरणातील चोरांचा शोध घेण्यासाठी आरपीएफ नागपूर विभागाचे विभागीय सुरक्षा आयुक्त दीपचंद्र आर्य यांच्या मार्गदर्शनाखाली आरपीएफ गोंदिया आणि आरपीएफ गुप्तचर शाखेचे अधिकारी, कर्मचाऱ्यांची दोन पथके तयार करण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी रस्त्यांवर आणि आजूबाजूला लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात आली. मोबाइल टॉवरच्या डेटाचे विश्लेषण करण्यात आले. जुन्या गुन्हेगारांना पकडून त्यांची चौकशी करण्यात आली. अखेर २४ डिसेंबर रोजी संध्याकाळी पथकाने ३ अल्पवयीन आणि २ रद्दी दुकान चालकांसह ७ आरोपींना अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून स्नॅक ट्रेचे छोटे तुकडे (एकूण १२४ किलो) चोरीला गेले. चोरीत वापरलेली ॲक्टीव्हा स्कूटर जप्त करण्यात आली. सात आरोपींंना अटक केली. एक आरोपी अद्याप फरार आहे.या आरोपींना पकडले
नवीन उर्फ नवीन वल्द सुनील भालाधरे (२२) रा. आझाद वाॅर्ड, हड्डीटोली गोंदिया, आदर्श उर्फ एलटू दिलीप गजभिये (१९) रा. आझाद वाॅर्ड, हड्डीटोली, गोंदिया, दिलीराम भिवाजी ठोकर (५४) व राजकुमार संपत बडगे (४०) दोन्ही रा. नागराधाम, मुकेश उर्फ बाबा रूपचंद रामटेके (३८) व अल्पवयीन बालके त्यात १६ वर्षाचे दोन तर १५ वर्षाचा एक असे तीन अल्पवयीन बालके,रा. गोंदिया यांना अटक करण्यात आली.दारू अन् गांजासाठी ते करायचे चोरी
अटक झालेल्या आरोपीं नियमितपणे दारू आणि गांजाचे सेवन करतात. हे व्यसन आणि छंद पूर्ण करण्यासाठी पैसे पुरविण्यासाठी ते निर्जन ठिकाणी उभ्या असलेल्या या रेल्वे स्थानकाच्या चेअर कार कोचच्या उघड्या दरवाजाचा आणि अंधाराचा फायदा घेत ते डब्यात घुसायचे. फराळाचे ट्रे फोडायचे आणि भंगार विक्रेत्यांना ९० रुपये किलो दराने विकायचे. आरोपींवर नियमानुसार कायदेशीर कारवाई करून त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले.