लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : विशेष सभेत झालेल्या निर्णयानंतर नगर परिषदेने आता मोक्षधाम परिसरात कचरा टाकणे बंद केले आहे. मात्र असे असतानाच गुरुवारी (दि.१८) गणेशनगर परिसरातील रामानी फ्लॅट स्कीमच्या मागे मोकळ्या जागेत खड्डा खोदून त्यात लग्नातील शिळे अन्न व मेलेल्या वराहाला टाकण्यात आले आहे. त्यातून पसरलेल्या दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. नगर परिषदेने हे कृत्य केले असल्याचे नागरिकांचे म्हणणे असून, गणेशनगरवासीयांत पुन्हा एकदा रोष निर्माण झाला आहे. मोक्षधाम परिसरात टाकला जात असलेला कचरा व त्याला आग लावल्याने निघणाऱ्या धुरापासून गणेशनगर व परिसरातील अन्य वसाहतींमधील नागरिक त्रासले होते. यावर नागरिकांनी एकत्र येऊन नगर परिषदेवर मोर्चा काढला होता. नागरिक व नगर परिषदेचा हा लढा चांगलाच वाढल्याने नगर परिषदेने यावर तोडगा काढण्यासाठी मोक्षधाम परिसरात कचरा टाकणे बंद केले आहे. एवढेच नव्हे तर बुधवारी (दि.१७) घेण्यात आलेल्या विशेष सभेत शहरातील कचरा टाकण्यासाठी पिंडकेपार परिसरात जागा घेण्याचे ठरले होते. यामुळे गणेशनगरवासीयांना कचऱ्यापासून सुटका मिळाली याचा आनंद होता. मात्र गुरुवारी (दि.१८) दुपारी गणेशनगर परिसरातील रामानी फ्लॅट स्कीमच्या मागे मोकळ्या जागेत खड्डा खोदून त्यात डिस्पोजेबल, लग्नातील शिळे अन्न, तसेच मेलेल्या वराहाला टाकण्यात आले व खड्डा बुजविण्यात आला नाही. त्यानंतर कुत्र्यांनी तेथे धुडघूस घातला. परिसरात दुर्गंधी पसरल्याने नागरिक त्रासले आहेत. नगर परिषदेचे हे कृत्य असल्याचे नागरिकांचे म्हणणे असून, यानंतर मात्र त्यांचे टेन्शन पुन्हा एकदा वाढले आहे.
नागरिकांनी केली संबंधितांवर कारवाईची मागणी - गुरुवारी टाकण्यात आलेल्या कचऱ्यात लग्नातील शिळे अन्न व डिस्पोजेबल आहे. सोबतच ३ मेलेले वराह असल्याने हे नगर परिषदेचेच काम असल्याचे नागरिकांचे म्हणणे असून, हा विषय सध्या चर्चेचा बनला आहे. एकीकडे कचरा टाकण्यासाठी पिंडकेपार येथे जागेची व्यवस्था केली असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यानंतर कोठेही कचरा टाकला जात असल्याने नागरिकांनी चांगलाच रोष व्यक्त केला असून, संबंधितांवर कारवाईची मागणी केली आहे.