लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : गोंदिया-आमगाव मार्गावरील ग्राम खमारी येथील नैनादेवी राइसमिल जवळ क्रेनच्या धडकेत माळी समाज संघटनेच्या अध्यक्षांचा मृत्यू झाला. शुक्रवारी (दि.१८) सायंकाळी ५.४५ वाजताच्या सुमारास घडली. तेजराम भोलाजी किरणापुरे असे मृताचे नाव असून, त्यांच्या अपघाती मृत्यूमुळे गावात वातावरण तापले होते व त्यांनी चक्काजाम आंदोलन केले. यात आमदार विनोद अग्रवाल यांच्या मध्यस्थीने मृताच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्यात आल्यानंतर मध्यरात्री सुमारे ३.३० वाजता आंदोलन मागे घेण्यात आले. तेजराम किरणापुरे हे सायकलने मजुरीच्या कामावरून घरी परत जात असताना हायड्रा क्रेन क्रमांक एमएम३५- एआर ३१३३ च्या चालकाने त्यांना धडक दिली व त्यात किरणापुरे यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर गावकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला. मृताच्या कुटुंबीयांना मदत देण्याच्या मागणीला घेऊन खमारीवासीयांनी चक्काजाम आंदोलन केले. या घटनेची माहिती मिळताच आमदार यांनी घटनास्थळ गाठले व मृताच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा यासाठी रात्री १२.३० वाजता चक्काजाम आंदोलन केले. जोपर्यंत क्रेनचा मालक येऊन कुटुंबीयांना आर्थिक मदत देत नही तोवर मृतदेह उचलला जाणार नाही या मागणीवर आमदार अग्रवाल व गावकरी अडून बसले होते. यावर क्रेनमालक घटनास्थळी आले व त्यांनी मृताच्या कुटुंबीयांना एक लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा केली. त्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून आमदारांनी रात्री ३.३० वाजतादरम्यान आंदोलन मागे घेतले. तसेच आमदार अग्रवाल यांनी स्वत: २५ हजार रुपयांची आर्थिक मदत मृताच्या कुटुंबीयांना दिली. प्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात क्रेनचालकावर चुन्नीलाल राजाराम किरणापुरे (५३, रा.भरतनगर, खमारी) यांच्या तक्रारीवरून भादंविच्या कलम २७९,३०४ (अ) भादवी सहकलम १८४ मोटार वाहन कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तपास पोलीस हवालदार गोस्वामी करीत आहेत.