लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : गॅस कनेक्शनधारकांना केवायसी करण्यासाठी वितरकांकडून आवाहन केले जात आहे. मात्र, केवायसीकडे अनेकांनी पाठ फिरविल्याचे दिसून येते. अनेकांची केवायसी रखडल्याने वितरकांना डाटा अपडेट करताना चांगल्याच अडचणी येत असून, केवायसी न केल्यास गॅस कनेक्शन बंद होणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्याचवेळी अशा ग्राहकांना सबसिडीही मिळणार नाही.
प्राप्त माहितीनुसार, केवायसी करण्यासाठी गॅस ग्राहकांना काही दिवसांपूर्वी सूचित करण्यात आले होते. गोंदिया शहर आणि परिसरातील वितरकांकडे ३१ मे ही अंतिम मुदत देण्यात आली आहे. यापूर्वी दिलेल्या मुदतीत केवायसी करण्याकडे अनेकांनी पाठ फिरविल्याचे चित्र आहे. सर्वच गॅसधारकांना केवायसी करणे अनिवार्य आहे. केवायसी न करणाऱ्या नियमित ग्राहकांना तसेच उज्ज्वला योजनेच्या गॅस कार्डधारकांना ३०० रुपये दिली जाणारी सबसिडी कायमची बंद केली जाणार आहे. त्यामुळे गॅससेवेचा लाभ घेणाऱ्या सर्व ग्राहकांनी केवायसी करून घ्यावी, असे आवाहन सर्वच गॅस एजन्सीच्या संचालकांकडून करण्यात आले आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी गॅसधारकांना आपल्या कनेक्शनची केवायसी करणे बंधनकारक केले असून, केवायसी न केल्यास संबंधित ग्राहकाचे गॅस कनेक्शन बंद होणार असून, अनुदानही येणार नाही. त्यामुळे सर्वांना केवायसी करून घेणे बंधनकारक आहे.
ग्राहकांना एजन्सीवर जाऊन करता येणार केवायसी■ यापूर्वी पेट्रोलियम कंपन्यांची काही बंधने नसल्याने गॅस नियमानुसार उपलब्ध होत होता; परंतु आता केवाय-सीसाठी कडक निर्बंध लावल्याने ग्राहकांना गॅस दिला जाणार नाही. त्यामुळे एकाच पत्त्यावर आणि एकाच नावावर वेगवेगळ्या कंपन्यांचे कनेक्शन रद्द करण्याचा निर्णय कंपन्यांनी घेतला आहे.■ गॅसधारकांनी एजन्सीमध्ये जाऊन केवायसी करून घ्यावी, त्यासाठी आधार कार्ड, मोबाइल क्रमांक, गॅस जोडणी ग्राहकांचे पुस्तक, ग्राहकांचे फेस रीडिंग किंवा थम्ब, हे पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत. केवायसी झालेल्या ग्राहकांचा साठा उपलब्ध असून, ६० टक्के गॅस कार्डधा- रकांची केवायसी अजून बाकी असल्याचे सांगण्यात येत आहे.
केवायसीकरिता कंपनीकडून ३१ मेपर्यंत मुदत देण्यात आली आहे. नागरिकांनी केवायसी करून सहकार्य करावे. आमगाव शहरात अद्याप केवळ ३५ ते ४० टक्के ग्राहकांची केवायसी झाली आहे.- सुनील माहेश्वरी, व्यवस्थापक, आमगाव