मुन्नाभाई नंदागवळी
बाराभाटी : गावालगत ग्रामीण भागात गावरान आंब्याच्या आमराई आहेत, पण त्या अमराईत उन्हाळ्यात अनेक दिवस मुले खेळत असत, बागडत असत, दिवसभर वेळ घालवून मनसोक्त असायचे, मन मोहरून जाई, पण आता हा आमराईचा गोडवा राहिलाच नाही, असे चित्र ग्रामीण भागातील आमराई बागेचे दिसत आहे. त्या गोडव्याच्या फक्त आठवणीच राहिल्या, सारी अमराई ओसंडून गेली आहे.
परिसरात अनेक गावाला लागून आमराई आहेत, या आमराई अख्खा उन्हाळा घालवत असत, आमराईमध्ये स्वदेशी खेळ आट्यापाट्या, लंगडी, फुगडी, डब्बा ड, मामाचे पत्र हरवले ते मला सापडले, नाक चिकली, बेंडवा, चंगाअष्टा, गाण्याच्या भेंड्या, नवरीनवरदेव, असे खेळ खेळण्याच्या निमित्ताने घरून मुले-मुली पाण्याच्या बाॅटल घेऊन आमराई दाखल होत.
लागलीच आमराई ही एका सरळ रेषेत आंब्याची झाडे लावली जात असत. या आमराई ह्या गावातील गर्भश्रीमंत व सावकारांच्या मालकीच्या आहेत आणि आमराई रचना ही मनाला स्पर्शून जाणारी असायची, काय तो दुपारचा देखावा, किरकिरीचा सुमधुर संगीत, कडक उन्हाच्या मध्यस्थी आब्यांची गर्द भरलेली घनदाट सावली असायची, असे वाटायचे ‘हे विश्वची माझे घर’... लागूनच तळे, बोळीची पार, त्या पारीवर मोहरलेले चिचेंचे झाड आहेत, नकळत पोरांचा मोर्चा हा चिचेंच्या झाडाकडे वळून चिंचेचे आस्वाद घेत असत, चिंचांपासून अनेक रुचकर पदार्थ तयार करून खायची. एक वेगळीच गंमत असायची, ही मजा औरच आहे. आंब्याच्या आमराईत आजही भर दुपारी मन एकदम प्रसन्न होतो. आंबा हा फळांचा राजा आहे, अनेक मानवी, पशुपक्षी प्राणिमात्रांच्या मनावर आजही राज्य करत आहे. आंबा म्हटले की, तोंडाला पाणी येतोच हे नाकारता येत नाही. कलमी, नीलम, डागील, सेंदरी, तांबूस, कोयार, बुडगा, चिप अशा प्रकारचे आंबे आजही गावरान आमराईत आहेत.
.......
आंब्याची नवलाई .....
आंब्यापासून अनेक पदार्थ तयार करतात, लोनचे, कैरी, पन्हा, खुला, आंबट भुरका, आमरस असे करीत असतात, तसेच आंब्याच्या गुहीचा पण उपयोग होतो, गुहीपासून नवीन रोपटे होतात, तर गुह्या वाळवून ठेवले की, त्यांना विकता येते, असा छोटासा व्यवसाय पण करता येतो. आज जर पाहिले, तर आंबा हा महागला आहे, दिवसेंदिवस गावरान आंबाचे उत्पादन कमी होत आहे, कारण वादळवारा येतो. माकडे नासधूस करतात, अशामुळे आंब्याचा बहार हा फार काळ टिकत नाही आणि याचा उत्पादनावर परिणाम पडत असतो. अशा अनेक आठवणींच्या मोहात गावरान आमराई ओसांडली आहे, त्या आमराईच्या आठवणी आजही मनाला ताजेतवाने करतात, आठवणीने मन रमून जाते, पण असेच जगावे लागते आठवणींच्या साहाय्याने, याची साक्ष आजही गावरान आमराई देत आहे.