सडक अर्जुनी : येथील गोंदिया डिस्ट्रिक्ट सेंट्रल को-ऑपरेटिव्ह बँकेची लिंक मागील दोन दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे बँकेत आर्थिक व्यवहारासाठी येणाऱ्या ग्राहकांना कामे न होताच परत जावे लागत आहे. त्यामुळे ग्राहकांचा वेळ सुद्धा व्यर्थ जात असल्याने रोष व्यक्त आहे.
शहरातील गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत तालुक्यातील शेतकरी आणि सर्वसामान्य ग्राहकांचे खाते आहेत. त्यातच सध्या खरीप हंगाम सुरु असल्याने पीक कर्जाची उचल करण्यासाठी शेतकऱ्यांची बँकेत गर्दी आहे. मात्र दोन दिवसांपासून लिंक फेल असल्याने ग्राहकांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागत आहे. २० ते २५ कि.मी. अंतरावरून ग्राहक सकाळी १० वाजता बँकेत येत आहे. पण लिंक बंद असल्यामुळे त्यांना आल्या पावली परत जावे लागत आहे. शेतीचे कामे सोडून आत्ता बँकेच्या चकरा माराव्या लागत आहेत. जिल्ह्यातील सर्वच को-ऑपरेटिव्ह बँक सुरू आहेत. त्यामुळे याकडे वरिष्ठांनी लक्ष देऊन बँकेचे व्यवहार सुरळीत करण्याची मागणी केली आहे.