लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मागील दोन वर्षांपासून जनरल तिकीट विक्री बंद आहे, तर लोकल आणि पॅसेंजर गाड्यासुद्धा पूर्ववत सुरू झालेल्या नाहीत. पण आता कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आला असून सर्वच व्यवहारदेखील सुरळीत झाले आहेत. त्यामुळे रेल्वे विभागानेसुद्धा बंद केलेल्या सुविधा पूर्ववत करण्यास सुरुवात केली आहे. रेल्वे बोर्डाने जनरल तिकीट विक्री सुरू करण्याचे निर्देश दिले असून यासंबंधीचे आदेशसुद्धा गोंदिया रेल्वे स्थानकाला प्राप्त होणार आहेत. विदर्भ, महाराष्ट्र एक्स्प्रेस, छत्तीसगड एक्स्प्रेससह ज्या गाड्यांचे जनरल डबे आरक्षित करण्यात आले होते, त्या सर्व गाड्यांचे डबे पूर्ववत जनरल केले जाणार आहेत. मात्र यासाठी प्रवाशांना आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. कारण जनरल तिकीट विक्री बंद असल्याने अनेकांनी तिकीट आरक्षित केले आहे. त्यामुळे हा आरक्षित तिकिटांचा कोटा पूर्ण संपल्यानंतर या गाड्यांसाठी जनरल तिकीट विक्री सुरू केली जाणार आहे. त्यामुळे तब्बल दोन वर्षांच्या कालावधीनंतर सर्वसामान्य प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
दोन वर्षांपासून आर्थिक फटका - कोरोनाच्या संसर्गामुळे मागील दोन वर्षांपासून रेल्वे जनरल तिकिटांची विक्री व लोकल आणि पॅसेंजर गाड्या बंद केल्या होत्या. त्या अद्यापही पूर्ववत केल्या नाही. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना मागील दोन वर्षांपासून आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
जनरल तिकीट या गाड्यांमध्ये मिळणार - विदर्भ, महाराष्ट्र एक्स्प्रेस, छत्तीसगड एक्स्प्रेससह ज्या गाड्यांचे जनरल डबे आरक्षित करण्यात आले होते, ते पूर्ववत जनरल केले जाणार असून या गाड्यांसाठी जनरल तिकिटांची विक्री सुरू केली जाणार आहे. त्यासाठीची प्रक्रियासद्धा रेल्वे विभागाने सुरू केली आहे. या गाड्यांमध्ये मिळणार नाही- ज्या गाड्यांना जनरल डबे जोडलेले नाही शिवाय त्यांच्यासाठी पूर्वीदेखील जनरल तिकीट लागू नव्हते, त्या गाड्यांसाठी जनरल तिकीट यापुढेदेखील लागू असणार नाही. त्यामुळे प्रवाशांना याची काळजी घ्यावी लागणार आहे.
बोर्डाने दिली हिरवी झेंडी रेल्वे स्थानकावरून जनरल तिकिटांची विक्री पूर्ववत सुरू करण्याचे निर्देश रेल्वे बोर्डाने दिले आहेत. यासंबंधीचे पत्रसुद्धा पात्र झाले आहे. पण आरक्षित तिकिटांचा कोटा पूर्ण झाल्यानंतर ही सुविधा सुरू केली जाणार आहे. - ए.के. राय, जनसंपर्क अधिकारी रेल्वे
प्रवासी म्हणतात.....कोरोनाचे कारण पुढे करत रेल्वे मागील दोन वर्षांपासून लोकल, पॅसेंजर बंद करून केवळ विशेष गाड्या सुरू ठेवल्या होत्या. त्यामुळे तिकिटाचा आर्थिक भुर्दंड सर्वसामान्य प्रवाशांना सहन करावा लागला. अद्यापही एमएसटीसह इतर सुविधा पूर्ववत केलेल्या नाही. - दिनेश राऊत, प्रवासी
जनरल तिकीट विक्री बंद असल्याने प्रवासासाठी तिकीट आरक्षित करावी लागत आहे. यामुळे आर्थिक भुर्दंड बसत आहे तसेच बरेचदा कन्फर्म तिकीट मिळत नसल्याने विनातिकीट दंड भरून प्रवास करावा लागत आहे.- रमाकांत कामडी, प्रवासी