२५ टक्के नफा : फुटाना वन व्यवस्थापन समितीचे नावीण्यपूर्ण उपक्रमदेवरी : तालुक्यातील दुर्गम क्षेत्रात फुटाना हे गाव आहे. या गावात वन व्यवस्थापन समितीने नाविण्यपूर्ण उपक्रम राबवून लागवड केलेल्या विविध जातींच्या रोपांद्वारे आता लाखोंचे उत्पन्न मिळत आहे. यात २० ते २५ टक्के नफा असल्याचे सांगण्यात आले आहे.सदर गावात २८ आॅगस्ट १९९३ रोजी वन व्यवस्थापन समिती स्थापन करुन संस्था अधिनियम १८६० अन्वये या संस्थेची नोंदणी करण्यात आली. नोंदणी क्र.४२४/२००० (भंडारा) असे आहे. संयुक्त वन कार्य योजनेप्रमाणे फुटाना गावच्या हद्दीत असलेले एकूण १११.७५ हेक्टर वन क्षेत्रापैकी १०० हेक्टर वनक्षेत्र या समितीला संरक्षणासाठी वर्ग करण्यात आले होते. या क्षेत्रामध्ये आढळणाऱ्या प्रमुख प्रजातीमध्ये उतरत्याक्रमाने सिहना, कुंभो, साता, धावडा, कसई या सारख्या वृक्षाची प्रजाती असून झुडपी/मध्यम उंचीचे प्रजातीमध्ये लोखंडी, कुडवा, घोटी, बहावा, पळस आदीचा समावेश् आहे. या गावासाठी सीमित वनक्षेत्र व अनिर्बंध चराईमुळे वनक्षेत्राचा मोठ्या प्रमाणावर ऱ्हास झालेला होता. त्याकरिता या समितीला हस्तांतरीत क्षेत्रात १९९७-९८ व १९९८-९९ मध्ये प्रतिवर्ष ३० हेक्टर क्षेत्रावर रोपवन तसेच मृंद संधारणाची कामे घेण्यात आली. त्यानुसार सन १९९७-९८ व १९९८-९९ मध्ये एकूण ६० हेक्टर क्षेत्रावर १ लाख २४ हजार ५०० साग रोपे, १३ हजार बांबू रोपे व १० हजार ५०० इतर प्रजातीचे रोपे लागवड करण्यात आले होते. यात क.नं. ५७७ या राखीव वनातून कार्य आयोजनेप्रमाणे ५७ हजार २००बांबू व ४ हजार २०० बांबू बंडल्स कटाई करुन लिलावामार्फत विक्री केली. यातून जवळपास या समितीला २० लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न प्राप्त झाला आहे. यात २० ते २५ टक्के नफा या विक्रीमध्ये झाला आहे. फुटाणा संयुक्त वन व्यवस्थापन समितीने संवर्धन व संरक्षण तसेच जनजागृतीसंबंधी केलेल्या कामाच्या आढावा असा आहे. वनीकरण समितीमार्फत १९९७-९८ व १९९८-९९ मध्ये प्रत्येकी ३० हेक्टर रोपवनात सागवन तसेच बांबू रोपांची वाढ चांगली झाली असून सध्या साग रोपाची वाढ ६ ते ८ मीटरपर्यंत झालेली आहे. यांची गोलाई ३० सेमीपर्यंत आहे. सन २०१५-१६ मध्ये ५७ हजार २०० बांबू, ४ हजार २०० बांबू बंडल्सचे उत्पादन झाले असून त्यापासून २० लाखापेक्षा जास्त रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले आहे. मृंदासंधारण १९९७-९८ मध्ये रोपवन क्षेत्रामध्ये ३० हेक्टर क्षेत्रावर जलशोषक खंदक खोदण्यात आले. त्यामुळे जमिनीच्या पृष्ठभागावरुन वाहून जाणारे पाणी व सुपीक माती अडविण्यास मदत झाली. जल व मृंद संधारण चांगल्याप्रकारे कामे करण्यास समितीस यश आले. वनसंरक्षण समितीने गावामध्ये जनजागृती केल्यामुळे रोपवन क्षेत्राचे उत्तम प्रकारे संरक्षण केलेले असून अवैधरित्या चराई करणाऱ्यांवर व अवैध वृक्षतोड करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करुन सन १९९८ ते २००० या दरम्यान अंदाजे रुपये २३ हजार ३०० रूपये जमा केले. त्यातूनच समितीने रोपवनाच्या देखरेखीसाठी रोपवन रखवालदार नेमून संरक्षण केले. वनवनवा प्रतिबंधक उपाययोजना वनक्षेत्र तसेच रोपवन क्षेत्र आगीपासून संरक्षण करण्याचे दृष्टीने अग्नीप्रतिबंधक उपाययोजना आखून निधीचा विनियोग समितीचा ठराव घेवून करण्यात येतो. तसेच वनक्षेत्रात आग लागल्यास गावकरी स्वयंस्फूर्त सहभाग घेवून आग विझविण्याच्या कामात मदत करतात. सदर फुटाना हे गाव तालुक्यातील एक आदर्श गाव म्हणून ओळखल्या जातो. तसेच फुटाना हे गाव आमगाव-देवरी विधानसभेचे आमदार संजय पुराम यांनी दत्तक घेतले आहे. क.नं. ५७७ राखीव वनातून कार्य आयोजनेप्रमाणे ५७ हजार २०० बांबू व ४ हजार २०० बांबू बंडल्स कटाई करण्यात आली. त्यातून त्यांनी संयुक्त वन व्यवस्थापन समितीने नाविण्यपूर्ण पद्धतीने बांबूची साईजवार कटाईकरुन लिलावामार्फत विक्री केली. साईजवार कटाई केलेल्या बांबूतून त्यांना जवळपास २० लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. यात २० ते २५ टक्के या विक्रीमध्ये फायदा समितीला झाला. सदर समितीने केलेल्या कामाची प्रशंसा वन अधिकाऱ्यांनी केली आहे. सदर नाविण्यपूर्ण कामाचे श्रेय संयुक्त वन व्यवस्थापन समितीने समितीचे अध्यक्ष ओमलाल देशमुख, सचिव क्षेत्र सहायक एस.आर. ताकसांडे व उत्तर वनपरिक्षेत्र अधिकारी निलय भोंगे यांना दिले असून यांच्या मार्गदर्शनाने कार्य यशस्विरित्या पार पाडले. (प्रतिनिधी)
रोपे लागवडीतून लाखोंचे उत्पन्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2016 2:15 AM