प्रथम या, प्रथम घ्या : कौशल्य विकास अभियानलोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : भारत सरकार वस्त्र मंत्रालय हस्तशिल्प विकास विभागांतर्गत आंबेडकर हस्तशिल्प विकास योजना (एएचवीवाय), प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना (पीएमकेव्हीवाय) व राज्य शासनाच्या प्रमोद महाजन कौशल्य विकास अभियानाचे व्होकेशनल ट्रेनिंग प्रोव्हायडरच्या (व्हीटीपी) वतीने शिवणकला, गोंडी पेटींग, गोंडी एम्ब्रायाडरी, गोंडी साडी वर्क इत्यादींचे प्रशिक्षण देण्याचे कार्यक्रम सुरु करण्यात येत आहे. यासाठी प्रशिक्षण कालावधीचा विद्यावेतनसुद्धा देण्यात येणार आहे. शिक्षीत व अशिक्षितांच्या बेरोजगारीचे प्रमाण दिवसेंदिवस झपाट्याने वाढत चालले आहे. प्रत्येक बेरोजगाराला नोकरी देणे, शासनाच्या क्षमतेबाहेर असून बेरोजगार युवक-युवतींच्या क्षमतेनुसार त्यांच्या अंगी असलेल्या कलाकौशल्यानुसार त्यांना स्वयंरोजगार करण्याची संधी मिळाली तर आत्मनिर्भरता येवू शकते. स्वयंरोजगारातून आर्थिक सहायता आल्यास बेरोजगारांची संख्या घटेल व देशाची आर्थिक बाजू सुद्धा भक्कम होण्यास मदत मिळेल. या हेतूने केंद्र शासनाने कौशल्य विकासावर आधारित प्रशिक्षण देण्याचे ठरविले. मात्र राज्य शासनाच्या वतीनेसुद्धा काही उपक्रम चालविल्यात येत आहेत. त्या अनुषंगाने सालेकसा येथील आदिवासी स्वयं कला संस्था येथे प्रशिक्षण वर्ग सुरु करण्यात येत आहे. यासाठी जे पहिले अर्ज करतील त्या प्रशिक्षणासाठी पहिले पात्र ठरविण्यात येईल. प्रशिक्षण घेणाऱ्या इच्छूक युवक-युवतीने आपले पासपोर्ट छायाचित्र, आवश्यक प्रमाणपत्र व कागदपत्रे घेऊन येणे आवश्यक आहे. प्रत्येक ट्रॅकवर २ ते ६ महिने प्रशिक्षण देण्यात येईल. प्रशिक्षण ठिकाणी अधिकारी दोन्ही स्वरुपाचे राहतील. प्रशिक्षणार्थ्याला १ हजार २०० ते १२ हजार रुपयांपर्यंत विद्यावेतनाची सोय केंद्र व राज्य शासनाकडून करण्यात आली आहे. एकाच गावातील २० पेक्षा जास्त महिला व मुली प्रशिक्षण घेण्यास इच्छूक असल्यास त्याच गावी प्रशिक्षण केंद्र स्थापित करुन शासनाच्या सर्व सोयी सुविधा पुरविण्यात येतील. आपल्या मातृभाषेसह मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेचा ज्ञान असल्यास प्राधान्य देण्यात येईल. पहिल्या प्रशिक्षणाच्या हस्तकला कालावधी संपल्यानंतर उर्वरित अर्जांचा विचार पुढील कालावधीसाठी करण्यात येणार आहे. इच्छूक युवक-युवतींनी ३१ जुलैपर्यंत करावे, असे आवाहन प्रशिक्षण केंद्राचे मुख्य कार्यकारी मनोहर उईके यांनी केले आहे.
नि:शुल्क हस्तकला प्रशिक्षण मिळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2017 1:29 AM