गोंदिया : ‘मे हीट’ म्हटली की, भल्याभल्यांच्या तोंडचे पाणी पळून जाते. यंदा मात्र ढगाळ वातावरण व पावसाच्या आगमनामुळे जिल्ह्यातील तापमान सामान्य राहिले व त्यामुळे ‘मे हीट’ तडाख्याचा जिल्हावासीयांना सामना करावा लागला नाही. विशेष म्हणजे, पुढील दिवसांतही आकाशात ढग दाटलेले राहणार व पावसाचाही हवामान खात्याचा अंदाज असल्याने, मे महिन्यातील पुढील दिवसही सामान्य तापमानातच जाणार, असे दिसत आहे.
उन्हाळा म्हणताच, अंगातून घामाच्या धारा निघतात. त्यातही मार्च व एप्रिल महिना कसा तरी निघून जातो. मात्र, सर्वाधिक तापणारा मे महिना कसा असणार, हा विचार करूनच अंगाची लाहीलाही होते. मे महिन्यात सूर्य सर्वाधिक तळपत असून, यालाच ‘मे हीट’ म्हटले जाते. मे महिन्यातील उन्हाचा तडाखा असहनीय राहत असून, कसातरी हा महिना निघून जावा, अशीच प्रार्थना सर्व करीत असतात. त्यातच सर्वाधिक तापणाऱ्या ९ दिवसांचा नवतपा मे महिन्यातच येत असल्याने, सर्वांच्या अंगाला थरकापच सुटतो.
यंदा मात्र, ढगाळ वातावरण व पावसाच्या आगमनाने जिल्ह्यात मे महिन्यात सूर्यदेव पाहिजे तसे तापले नाही. परिणामी, मे महिन्यात पडणाऱ्या उन्हाच्या तडाख्यापासून जिल्हावासीयांची सुटका झाली. जिल्ह्यातील तापमान बघितले असता, ४० अंश सेल्सिअसच्या आतच दिसून आले. म्हणजेच, दरवर्षी ४० पार जाणारा पारा यंदा सामान्य राहिल्याचे दिसले व त्यामुळे मे महिना थंडाथंडाच निघाला.
-----------------------------
नवतपालाही ढगाळ वातावरणाचा थंडावा
२५ मेपासून नवतपा सुरू होत आहे. नवतपातील ९ दिवस सर्वाधिक तापणारे राहात असल्याने, या ९ दिवसांना नवतपा म्हटले जाते. म्हणूनच नवतपा म्हणताच सर्वांच्याच भुवया उंचावतात. मात्र, यंदा नवतपातही आकाशात ढग दाटलेले राहतील व पावसाची शक्यताही हवामान खात्याने वर्तविली आहे. परिणामी, पारा सामान्य तापमानात राहणार असल्याचा अंदाज आहे.