गोंदिया : शासकीय काम आणि थोडा वेळ थांब असे विनोदाने म्हटले जाते; पण प्रत्यक्षात सुध्दा तीच स्थिती आहे. घरकूल बांधून तब्बल तीन वर्ष लोटूनही त्याचे अनुदान मिळत नसल्याने या प्रकाराने वैतागलेल्या लाभार्थ्याने चक्क घरकूलच विकायला काढल्याचा प्रकार देवरी येथे उघडकीस आला आहे.
देवरी शहरातील प्रभाग क्रमांक ९ मध्ये राहणारे चंद्रहास केशोराव लांडेकर यांना २०१८-१९ मध्ये घरकूल मंजूर झाले. त्यांनी घरकुलाचे बांधकाम केले. मात्र अद्यापही त्यांना शेवटचा हप्ता मिळाला नाही. ज्यांच्याकडून उसनवारी केली, ते आता पैशांसाठी तगादा लावत आहेत. २८८ पैकी १७८ लाभार्थ्यांची देखील हिच स्थिती आहे. वारंवार लाभार्थी नगर पंचायतीत जाऊन शेवटच्या हप्त्याची मागणी करीत आहेत. मात्र शासनाकडून पैसे आले नसल्याचे सांगत त्यांना परत पाठविण्याचे काम देवरी नगर पंचायत करीत आहे. या प्रकाराला कंटाळून अखेर चंद्रहास केशोराव लांडेकर यांनी आता कर्जाची परतफेड करण्याकरिता आपले घरकूल विकायला काढले आहे. त्याची रितसर परवानी त्याने नगर पंचायतीकडे मागितली आहे. यामुळे नगर पंचायतीपुढे पेच निर्माण झाला आहे. नगरपंचायतचे अध्यक्ष आणि मुख्याधिकारी घरकूल लाभार्थी चंद्रहास लांडेकर यांची समजूत काढत आहेत.
कर्जाची परतफेड कुठून करणार
मला २०१८-१९ या वर्षी देवरी नगरपंचायततर्फे प्रधानमंत्री योजने अंतर्गत रुपये २ लक्ष ५० हजार रुपयांचे घरकूल मंजूर झाले. उसनवारी करून बांधकाम पूर्ण केले. सुरुवातीचे दोन हप्ते मिळाले. शेवटचा ३० हजारांचा हप्ता अद्यापही मिळाला नाही. अनेकदा मागणी करूनही टाळाटाळ केली जात आहे. ज्यांच्याकडून उसनवारी केली. ते तगादा लावत असल्याने घर विकण्याची परवानगी मागितली असल्याचे चंद्रहास लांडेकर यांनी सांगितले.
प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांनी मनात गैरसमज ठेवू नये. दिलेले उद्दिष्टांचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर शासन पैसे देणार आहे. तातडीने उर्वरित लाभार्थ्यांनी बांधकाम करावे.
- संजय ऊईके, नगराध्यक्ष, नगर पंचायत देवरी
देवरी शहरात प्रधानमंत्री आवास योजनेच्या शेवटच्या ३० हजार रुपयांच्या हप्त्याला घेऊन लाभार्थ्यात गैरसमज आहेत. प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थांनी आपले शेवटचे कार्य पूर्ण न केल्यामुळे ९० टक्के लोकांचे काम पूर्ण झाले हे सिद्ध होत नसल्याने शासनाने निधी पाठविला नाही. संपूर्ण बांधकाम पूर्ण झाल्यावर निधी येणार असून तो लाभार्थ्यांना देण्यात येईल.
- प्रणय तांबे, मुख्याधिकारी, न.प. देवरी